राजकीय भाष्यकार प्रताप भानू मेहता यांच्या राजीनाम्याचे पडसाद

राजकीय भाष्यकार प्रताप भानू मेहता यांनी राजकीय दबावाखाली अशोक विद्यापीठातील प्राध्यापकपदाचा राजीनामा द्यावा लागला त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करणारे खुले पत्र जगभरातील नामांकित विद्यापीठांमधील १५०हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी विद्यापीठाच्या विश्वस्तांना लिहिले आहे.

हार्वर्ड, येल, कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि एमआयटी यासारख्या नामांकित विद्यापीठांमधील १५०हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी हे खुले पत्र लिहिले आहे. प्रताप भानू मेहता यांनी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिल्यानंतर हरयाणाच्या सोनिपतमधील हे विद्यापीठ आठवड्यापासून वादाच्या केंद्रस्थानी आहे.

आपण या विद्यापीठाशी संलग्न राहिल्यास ते आमच्यावरील राजकीय दायित्व असेल, असे या विद्यापीठाच्या संस्थापकांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितल्याचे मेहता यांनी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिल्यानंतर सांगितले होते. मेहता यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनीही विद्यापीठातील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

मेहता यांना त्यांच्या लेखनावरून लक्ष्य करण्यात आले असल्याचे विद्यापीठाला पाठविण्यात आलेल्या खुल्या पत्रामध्ये म्हटले आहे. त्यावर न्यू यॉर्क विद्यापीठ, ऑक्सफर्ड, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आदी नामांकित विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ला – रघुराम राजन

मेहता आणि सुब्रमणियन यांनी दिलेले राजीनामे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ला असून विद्यापीठाच्या संस्थापकांनी आत्मा गहाण ठेवण्याचा प्रकार आहे, अशी टीका रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी समाजमाध्यमांवरून केली आहे.