गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला चार दिवसांचा अवधी उरला असताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी रविवारी येथे जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. मोदी सरकार समाजात फूट पाडण्याचे काम करत असून त्यांच्यापासून गुजरातला मुक्त करण्याची वेळ आली आहे, अशी आक्रमक टीका त्यांनी केली. गुजरातमधील अल्पसंख्य धर्मीय असुरक्षित असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आमचे विरोधक ज्याप्रमाणे समाजात तेढ निर्माण करून, त्यांच्यात फूट पाडून आपले राजकीय हेतू साध्य करतात, त्या प्रकारचे राजकारण आम्हाला जमत नाही. या प्रकारचे राजकारण अतिशय हीन दर्जाचे असून ते दीर्घकाळ चालू शकत नाही. फुटीरतावादी राजकारण करणाऱ्यांपासून गुजरातला मुक्त करण्याची आता वेळ आली असून अशा जातीयवादी शक्ती पुन्हा सत्तेत येणार नाहीत, याची काळजी मतदारांनी घ्यायला पाहिजे. धर्म, जात, प्रदेश आदींच्या आधारे समाजाची विभागणी केली तर आपल्या देशाची प्रगती होऊ शकणार नाही, याची जाणीव असल्यानेच काँग्रेसने आजवर या प्रकारचे राजकारण केलेले नाही, असे ते म्हणाले.गुजरातमधील अल्पसंख्य धर्मीय असुरक्षित असल्याचा आरोपही पंतप्रधानांनी या भाषणादरम्यान केला. गुजरातमधील अल्पसंख्य समाजात असुरक्षेची भावना असून त्याबाबत सरकारविरोधात सातत्याने आमच्याकडे तक्रारी येत आहेत, केवळ अल्पसंख्यच नव्हे तर काही सरकारी अधिकाऱ्यांच्याही गुजरात सरकारच्या पक्षपातीपणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या राज्यात अशी परिस्थिती असणे हे आपल्या देशासाठी खूपच दुर्दैवी व खेदजनक आहे, असे ते म्हणाले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liberate gujrat pm politics manmohan singh
First published on: 10-12-2012 at 01:25 IST