भारताचा विंडीज दौरा ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण त्याने स्वतःहून दौऱ्यातून माघार घेतली. सैन्यदलात प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने त्याने ही विश्रांती घेतली. त्यानुसार धोनी सध्या काश्मीरमध्ये गस्त घालणार आहे. पण धोनी हा सेलिब्रिटी असल्यामुळे तो गस्त घालत असताना त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर असेल? असे प्रश्न काही लोकांकडून उपस्थित करण्यात आले होते. त्यावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दमदार उत्तर दिले.

“धोनीला सुरक्षा पुरवण्याची गरज भासेल असे आम्हाला अजिबातच वाटत नाही. तो त्याचे रक्षण करण्यास समर्थ आहे. तसेच तो देशवासीयांची रक्षण करण्यासाठीही तप्तर आणि समर्थ आहे. त्याला दिलेले कार्य तो नक्कीच पूर्ण जबाबदारीने पार पाडेल”, असा विश्वास रावत यांनी व्यक्त केला. “सैन्यदलात जेव्हा एखादी व्यक्ती भरती होते, तेव्हा येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आणि हिंमत त्यांच्यात असते म्हणूनच ते येतात. धोनीने त्याला स्वत:चे आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले आहे. तो देशातील नागरिकांचे संरक्षण नक्कीच करू शकतो”, असे ते म्हणाले.

“धोनी आता १०६ टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा सदस्य (पॅरा) आहे. त्यामुळे तो आता अनेकांचे रक्षण करू शकतो. ही बटालियन अत्यंत दमदार कामगिरी करणारी बटालियन आहे आणि तो हाच बटालियनचा भाग आहे, त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची गरज लागणार नाही”, अशी माहितीही त्यांनी दिली.

महेंद्रसिंग धोनी ३१ जुलैपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत गस्त घालणार आहे.