भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला असतानाच राहुल गांधींनीही मोदींवर पलटवार केला आहे. माझी हवी तेवढी खिल्ली उडवा, पण आधी देशातील तरुणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या असे आव्हान राहुल गांधींनी दिले आहे.  बँकेच्या रांगेत चोर नव्हे तर देशातील प्रामाणिक जनता उभी आहे असे त्यांनी म्हटले आहे.

गुरुवारी उत्तरप्रदेशमध्ये राहुल गांधी यांनी जनआक्रोश सभा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल केला आहे. चोरांनाही बँकेत रांगेत उभे राहावे लागते असे मोदींनी म्हटले होते. यावरुन राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.  बँकेच्या रांगेत चोर नाही तर ती सर्वसामान्य जनता आहे असे ते म्हणालते. बँकेसमोर रांगेत उभे असलेल्या सर्वसामान्यांकडे काळा पैसा नाही. काळा पैसा तर जे तुमच्यासोबत विमानातून प्रवास करतात त्यांच्याकडे आहे असे टीकास्त्र त्यांनी सोडले. तुम्ही काळा पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राईक केला नाही, तुम्ही देशातील सर्वसामान्य जनतेवर हल्ला केला असा आरोप त्यांनी केला. शेतकरी जेव्हा कृषी सामानाची खरेदी करतो त्याचे पैसे तो चेकने देतो की रोख स्वरुपात देतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. टीव्हीवर झळकण्यासाठी लाखो रुपये लागतात. मोदींना हे पैसे देशातील ५० कुटुंबांकडून पुरवले जातात. देशातील ५० कुटुंबांनी ८ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहेत. हे कर्ज माफ करण्यासाठी मोदींनी गोरगरीबांचे पैसे बँकेत टाकले. नोटाबंदीमागे हीच खेळी होती असा आरोप त्यांनी केला. नोटाबंदीचा निर्णय गरीब, शेतकरी, मजुरांच्याविरोधात होता असे ते म्हणालेत.

मोदींनी किती काळा पैसाधारकांना तुरुंगात टाकले. याऊलट त्यांनी ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांना देशातून पळ काढण्यात मदत केली असा पुनरुच्चारही त्यांनी केला. देशात कॅशलेस व्यवस्था असायला हवी. पण ती सर्वांवर लादू नये असेही त्यांनी सांगितले. मोदींनी बहराइचमधील सभेत फोनवरुन भाषण दिले होते. पण त्यात ऐवढे अडथळे होते की आवाज ऐकू येत नव्हता. मग अशा फोनने पैसे ट्रान्सफर होतील का असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. मोदींना बिर्ला समुहाकडून २५ कोटी तर सहारा समुहाकडून ४० कोटी रुपये मिळाले असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. या सभेत त्यांनी पुरावा म्हणून काही कागदपत्रही सादर केली. या सभेत गांधीनी हिंदी शायरीचा दाखला देत मोदींना चिमटा काढला. गांधी म्हणाले, मोदींना मी एका शायरीद्वारे उत्तर देऊ इच्छितो. ‘हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है,  तुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तुगू क्या है’ असे त्यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.