ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जूनमध्ये राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनचा नवीन पंतप्रधान कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिज ट्रस यांच्यात पंतप्रधानपदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर आज ब्रिटनचा नवीन पंतप्रधान कोण असणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. लिज ट्रस यांचा विजय झाला असून त्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतील.
लिज ट्रस यांनी पंतप्रधान शर्यतीतील माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. त्यांनी सुनक यांच्यावर सुमारे २० हजारांच्या मताधिक्याने मात केली. ट्रस यांना ८१,३२६ मिळाली असून सुनक यांना ६०,३९९ एवढी मतं मिळाली आहेत.
निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाल्यानंतर लिज ट्रस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देशाच्या आर्थिक विकासाठी पुढील दोन वर्षात भरीव कामगिरी करू, कर कमी करण्यासोबतच अर्थव्यवस्था वाढण्यासाठी प्रयत्न करू, असं ट्रस यांनी म्हटलं आहे.
आपलं विजयी भाषण करताना लिज ट्रस म्हणाल्या की, “कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याचा मला अभिमान वाटतो. आपल्या महान देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार. देशातील विविध समस्या सोडवण्यासाठी मी धाडसी निर्णय घेईन. या कठीण काळात देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी प्रयत्न करेन.” थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर ४७ वर्षीय लिज ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.