Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाम येथे आज दुपारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २० हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काही पर्यटक दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले आहेत. दुपारच्या दरम्यान पहलगाम येथील बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. अनेक पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धावाधाव केल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

पहलगाममधील स्थानिकांनी कँडल मार्च काढून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. “ज्या अतिरेक्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही आधी हिंदुस्तानी आहोत, त्यानंतर आम्ही काश्मीरी”, अशी भावना कँडलमार्चमध्ये सामील असलेल्या लोकांनी व्यक्त केली.

पीडीपी पक्षाचे नेते मोहम्मद फयाज यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. कँडल मार्चमध्ये सहभागी झाल्यानंतर ते म्हणाले, “काश्मीर हा आदारातिथ्यासाठी ओळखला जातो. मात्र आज काश्मीरची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे. ज्या लोकांनी हे भ्याड कृत्य केले, ते कोणत्याही धर्माचे नाहीत. त्यांनी माणुसकीची हत्या केली आहे. जगातील कठोरातील कठोर शिक्षा यांना व्हायला हवी. या दुःखद प्रसंगी आम्ही पीडित कुटुंबियांच्या मागे उभे आहोत.”

“या हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटनाला मोठा धक्का बसला आहे. सामान्य घोडे वाले, शिकारा चालविणारे, हॉटेलचे कर्मचारी पर्यटन हंगामाची वर्षभर वाट पाहत असतात. नुकत्याच सुट्ट्या पडल्या असून पर्यटक यायला सुरूवात झाली आहे. पण दहशतवाद्यांनी मुद्दामहून हा हल्ला केला आहे. यात काश्मीरचे मोठे नुकसान होईल”, असेही मोहम्मद फयाज म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याची दखल घेतली असून अतिरेक्यांना सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे श्रीनगरला पोहोचले असून त्यांनी प्रकरणाचा आढावा घ्यायला सुरूवात केली आहे. उद्या सकाळी ते पहलगामचा दौरा करणार असल्याचे सांगितले जाते.