भविष्यकाळात क्षेपणास्त्रे व उपग्रह सोडण्यासाठीच्या प्रक्षेपकांचे उच्च ऊर्जा असलेले इंधन काही जीवाणूंमध्ये जैवअभियांत्रिकी बदल घडवून तयार करता येणार आहे.
जॉर्जयिा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी हा प्रयोग यशस्वी केला असून त्यांनी झाडांमध्ये तयार होणाऱ्या पायनाईन या हायड्रोकार्बनचे संश्लेषण करून क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या जेपी १० या इंधनाला पर्याय तयार केला आहे.  
या झाडातील वितंचकाचा वापर जीवाणूंमध्ये करून त्यात काही अपेक्षित बदल घडवले गेले. त्यामुळे पायनाईनचे उत्पादन जैव अभियांत्रिकी तंत्राने सहा पटींनी वाढले. हे उत्पादन २६ पट वाढवता आले तरच हा शोध स्पर्धात्मक पातळीवर उपयोगी ठरणार आहे. पेट्रोलियमवर आधारित जेपी १० इंधनाशी बरोबरी करण्याकरिता वैज्ञानिक पायनाइनचे उत्पादन  स्पर्धात्मक पातळीवर करू शकतील अशी आशा आहे. पेट्रोलजन्य जेपी१० इंधनापेक्षा कमी खर्चात हे इंधन तयार करता येईल असे वैज्ञानिकांना वाटते. तसे करता आले तर जैवइंधनांचा वापर उच्च ऊर्जा इंधने म्हणून करता येईल.पायनाइन डायमर्सचे उत्पादन पायनाइनचे डायमेरायझेशन केल्यानंतर होते व त्याची ऊर्जा घनता जेपी-१० या इंधनाइतकीच दिसून आली आहे.  
इंधनाचे वजन कमी, पण शक्ती जास्त मिळवण्यासाठी सध्या जेपी १० इंधन वापरतात त्याच्यापेक्षा लिटरमागे फार कमी ऊर्जा डिझेल व गॅसोलिनमध्ये असते. जेपी-१० या इंधनाची रेणवीय रचना जास्त ऊर्जा निर्माण करण्यास कारणीभूत असते.  
तेलाच्या एका बॅरलमधून निघणाऱ्या जेपी १०  इंधनाचे प्रमाण फार कमी असते, त्यामुळे त्याची किंमत गॅलनला २५ डॉलर असते. कि मतीचा विचार करता जैवइंधन जास्त स्वस्तात तयार करता येईल असा वैज्ञानिकांना विश्वास वाटतो.  
जॉर्जयिा टेकचे पेराल्टा याह्या यांनी सांगितले की, आम्ही एवढी ऊर्जा देणारे गॅसोलिन ३ डॉलर प्रति गॅलन दरात तयार करू व त्यासाठी जैव अभियांत्रिकीची पद्धत वापरू. सध्या आम्ही लिटरला काही मिलिग्रॅम इतक्या पातळीवर प्रयोग केले असले तरी आम्ही जे उत्पादन तयार करीत आहोत ते गॅसोलिन किंवा डिझेलच्या किंमत पातळीला आणण्यास वेळ लागेल, कारण आता आमचा प्रयोग लहान प्रमाणात आहे.  
आतापर्यंत इथेनॉल व इतर जैवइंधने तयार करण्याचे प्रयत्न बरेच झाले, परंतु जेपी-१० सारखी उच्च ऊर्जा जैवइंधने तयार करण्याचे प्रयत्न प्रथमच होत आहेत. वैज्ञानिकांनी आताच्या प्रयोगात इ कोलाय जीवाणूत पायनाइन सिंथेज व ग्रेनल डायफॉस्फेट सिंथेज यांचे प्रत्येकी तीन असे सहा प्रकार वापरून सक्षम इंधन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.