लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेला संबोधित करताना तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मोठा आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत तडजोड झाली तसेच परकीय शक्तींनी भारतातील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

पराभवानंतर मी माझ्या राजीनाम्याचा प्रस्तावर ठेवला पण पक्षाने माझा राजीनामा फेटाळून लावला असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मला मुख्यमंत्रीपदावर रहायचे नाही हे मी माझ्या पक्षाला सांगितले. पण पक्षाने माझा निर्णय मान्य केला नाही. त्यामुळे पक्षाच्या इच्छेनुसार मी मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहे असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

या निवडणुकीत पैशाचा गैरवापर झाला. आम्ही याचा सामना कसा करायचा? राजस्थान, गुजरात, हरयाणामध्ये भाजपा इतक्या जागा कशा जिंकू शकते. लोक हे बोलायला घाबरतात पण मी घाबरत नाही.

निवडणूक आयोगावर नियंत्रण होते. केंद्रीय पथकांनी आमच्या विरोधात काम केले. आणीबाणीची स्थिती निर्माण करण्यात आली. हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी ही निवडणूक करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मतांची विभागणी झाली. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली पण कोणी दखल घेतली नाही असे ममता म्हणाल्या.