लंडन ब्रिज हल्ल्याप्रकरणी एक नवा खुलासा समोर आला आहे. या हल्लेखोरांच्या निशाण्यावर टेनिस जगतातील प्रतिष्ठीत अशी विम्बल्डन स्पर्धाही असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याचा मास्टर माइंड खुर्रम बट हा विम्बल्डन सामन्यांना सुरक्षा पुरवणाऱ्या संस्थेत नोकरीसाठी प्रयत्नरत होता. यावरून पोलिसांनी प्राथमिक स्तरावर विम्बल्डन स्पर्धा ही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा निष्कर्ष मांडला आहे.

‘द डेली टेलीग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस बटच्या योजनांविषयी तपास करत आहेत. सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या कंपनीमध्ये बट का नोकरी करू इच्छित होता, याचा शोध घेतला जात आहे. बट हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे.

‘द डेली टेलीग्राफ’ने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तात, या सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीत नोकरीसाठी बटला मुलाखत द्यायची होती. या महिना अखेरीस त्याची मुलाखत होणार होती. त्यामुळे विम्बल्डन सामने त्याच्या निशाण्यावर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रथम त्याने विम्बल्डनवर हल्ला करण्याचा विचार केला असेल. पण मँचेस्टर एरिना हल्ल्यानंतर त्याने आपली योजना बदलत लंडन ब्रिजवर हल्ला केला असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बटने भूमिगत मेट्रो रेल्वेत सहा महिने काम केले होते. गत ऑक्टोबर महिन्यात त्याने येथील नोकरी सोडली होती. तो एमआय ५ आणि दहशतवादविरोधी पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता. त्यानंतरही वेस्टमिनिस्टर स्थानकात नोकरी मिळवण्यात तो यशस्वी ठरला होता. कारण त्याने त्यावेळी आपल्यावरील गुन्हेविषयक प्रकरणांची  माहिती कंपनीपासून लपवली होती.

बट आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी रशीद रेदाने आणि यूसुफ जागबा यांनी लंडन ब्रिजवर लोकांना कारने चिरडले होते. त्यानंतर जवळच्याच बरो बाजारात त्यांनी हल्ला केला होता. या दोन्ही घटनांमध्ये ८ लोक मारले गेले तर डझनहून अधिकजण जखमी झाले होते.