वृत्तसंस्था, लंडन : विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची यादी ‘क्यूएस’ने जाहीर केली आहे. लंडन हे जगातील विद्यार्थ्यांसाठीचे सर्वोत्कृष्ट शहर असल्याचे या यादीतून दिसून येत आहे. परदेशातील विद्यार्थ्यांनाही लंडनमध्ये किफायतशीर आणि चांगले शिक्षण मिळत असून विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा, विद्यापीठांचा दर्जा याबाबतीत लंडन सरस असल्याचे या यादीत म्हटले आहे. भारतातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर मुंबई असल्याचेही ‘क्यूएस’ने म्हटले आहे.

क्यूएस विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर यादी दरवर्षी जाहीर केली जाते. यंदा २०२३साठीची यादी जाहीर करण्यात आली आहे. लंडननंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर दक्षिण कोरियातील सेऊल आणि जर्मनीमधील म्युनिच ही शहरे आहेत. चौथ्या क्रमांकावर झुरिच आणि पाचव्या क्रमांकावर मेलबर्न ही शहरे आहेत. मुंबई या यादीत १०३ व्या क्रमाकांवर असली तरी भारतात विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शहर मुंबई असल्याचे या यादीत म्हटले आहे. मुंबईत किफायतशीर शिक्षण मिळत असले तरी विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, असे नमूद करण्यात आले आहे. या यादीत बंगळूरु ११४ व्या, चेन्नई १२५ व्या आणि दिल्ली १२९ व्या क्रमांकावर आहे.

यादी कशाच्या आधारावर..

किफायतशीर शिक्षण, गुणवत्ता, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांचा दर्जा, शैक्षणिक व विद्यार्थ्यांसाठीच्या विविध सुविधा आणि या शहरांतून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांची मते यांच्या आधारावर ही यादी तयार केली जाते.

यादी काय सांगते?

  • ‘क्यूएस’कडून विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट १४० शहरांची यादी जाहीर
  • लंडन पहिल्या तर सेऊल व म्युनिच दुसऱ्या क्रमांकावर.
  • मुंबई १०३ व्या, बंगळूरु ११४व्या आणि चेन्नई १२५व्या क्रमांकावर
  • अरब देशांमधील  दुबई हे विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर. जगात दुबई ५१ व्या क्रमांकावर
  • लॅटिन अमेरिकेतील ब्युनॉस आयर्स सर्वोत्कृष्ट शहर. जगात २३ व्या स्थानावर.