लंडन हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानी वंशाच्या एका दहशतवाद्याच्या नातेवाइकाच्या रेस्टॉरंटवर छापे टाकण्यात आले आहेत. लंडनच्या हल्ल्यात सात जण मारले गेले होते. खुरम बट (वय २७) याच्यासह दोन दहशतवाद्यांनी लंडन ब्रिज येथे पांढऱ्या रंगाची व्हॅन पादचारी मार्गावर घातली होती. त्यानंतर त्यांनी व्हॅनमधून उतरून बरो मार्केट येथे भोसकाभोसकी सुरू  केली.

ब्रिटनच्या पोलिसांनी या हल्ल्यातील दोघांची ओळख पटवली असून त्यातील एक हल्लेखोर पाकिस्तानी वंशाचा खुर्रम बट, तर दुसरा मोरोक्को लिबयन वंशाचा राशिद रेडॉनी हा होता. आज सकाळी साध्या वेशातील अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात बट याच्या नातेवाइकाच्या मालकीचे असलेल्या झेलम शहरातील रेस्टॉरंटवर छापे टाकले. हे ठिकाण इस्लामाबादच्या आगे्नयेला ६० मैल अंतरावर असल्याचे टेलिग्राफने म्हटले आहे. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी नासीर बट या उद्योगपतीच्या मालकीच्या रेस्टॉरंटवर छापे टाकले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, बट यांला मूलतत्त्ववादाची शिकवण पाकिस्तानमध्ये नव्हे तर ब्रिटनमध्ये मिळाली होती,पण आम्ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून छापे टाकत आहोत. संशयित बट याला सीरियात मूलतत्त्ववादाची शिकवण मिळाली असावी. त्याच्याशी संबंधितांची घरे व आस्थापने तपासली जात असून काही टेलिफोन कॉलची माहिती घेतली जात आहे.  बट हा बार्किंग येथे राहणारा होता व त्याचा जन्म झेलम येथे झाला. त्याचे वडील सैफ यांचे झेलम येथे फर्निचरचे दुकान होते. १९८८ मध्ये ते ब्रिटनला स्थायिक झाले.

झेलम हा पाकिस्तानचा भाग असून ब्रिटनमधील अनेक पाकिस्तानी मूळ या गावचे आहेत. हे ठिकाण पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूरजवळ आहे, त्याला ‘लिटल इंग्लंड’ असेही म्हणतात.

दरम्यान मँचेस्टर हल्ल्यातील आत्मघाती हल्लेखोर सलमान अबेदी याच्या भावाला ब्रिटनमध्ये पोलिसांकडून सोडून देण्यात आले आहे. २३ मे रोजी इस्माइल अबेदी याला चोर्लटन पोलिसांनी अटक केली होती. त्याला २२ जण ठार झालेल्या मँचेस्टर हल्ल्यासंबंधी ताब्यात घेतले होते.  सलमान अबेदी याचे मूळ कुटुंब लीबियातील असून तो अमेरिकी गायिका अरियाना ग्रांदे हिच्या संगीत मैफिलीनंतर झालेल्या आत्मघाती स्फोटात स्वत:ही मारला गेला होता. त्याचे वडील रमादान अबेदी यांना त्रिपोलीत अटक  करण्यात आली असून सलमानचा लिबीयन सुरक्षा दलात काम करणारा भाऊ हाशिम याला हल्ल्याची सर्व माहिती होती असे समजते.

लंडन हल्ल्यांच्या संदर्भात पोलिसांची नव्याने शोधमोहीम

लंडन ब्रिज हल्ल्याच्या संबंधात ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वाची सुटका करण्यात आल्याचे सांगितल्यानंतर काही तासांत पोलिसांनी या हल्लेखोरांपैकी दोघांच्या घरांजवळील परिसरात मंगळवारी नव्याने शोधमोहीम हाती घेतली. अलीकडच्या काही वर्षांमध्ये पोलिसांच्या संख्येत कपात करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर, गेल्या तीन महिन्यांत ब्रिटनमध्ये झालेल्या या तिसऱ्या हल्ल्याने देशवासीयांचे संरक्षण करण्याच्या सरकारच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गुरुवारी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. युरोपीय महासंघातून ब्रिटनने बाहेर पडण्याबाबतच्या चर्चेत आपली बाजू बळकट करण्याच्या आशेने मध्यावधी निवडणुका बोलावणाऱ्या पंतप्रधान थेरेसा मे यांना आता पोलिसांच्या संख्येत कपात केल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागत

आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पूर्व लंडनच्या बार्किंग उपनगरातून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व १२ लोकांना सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोर गटाचे आणखी काही साथीदार होते काय, हे शोधण्यासाठी बार्किंगच्या उत्तरेकडे असलेल्या इलफोर्ड येथे पोलिसांनी नव्याने शोध सुरू केला आहे. हल्लेखोरांपैकी खुर्रम शाझाद बट्ट आणि राचिद रेडौन यांची ओळख पटली असून, तिसऱ्याची ओळख अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नाही. बनावट आत्मघातकी कंबरपट्टे घातलेले तिघेही हल्लेखोर हल्ल्यानंतर मारले गेले होते.