न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना भारताने १८ धावांनी गमावल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ६ बाद ९२ अशा कठीण स्थितीतून जडेजा आणि धोनी यांची विजयाकडे वाटचाल सुरू होती. मात्र जडेजा झेलबाद झाल्यानंतर ती थांबली. तर निर्णायक क्षणी धोनी मार्टिन गप्टिलच्या थेट फेकीमुळे धावचीत झाला आणि भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. धोनी धावबाद झाल्याने सामन्याला शेवटच्या क्षणी कलाटणी मिळाली असं मत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामन्यानंतर व्यक्त केले. गप्टिलने डीप फाइन लेगवरुन फेकलेला चेंडूने स्टंपचा वेध घेतला आणि न्यूझीलंडने जणू विजयाचा आनंद साजरा केला. मात्र आमचे नशीब बलवत्तर असल्याने तो चेंडू स्टंपला लागला असे मत गप्टिलने नोंदवले आहे.

रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर शेवटच्या १० चेंडूमध्ये भारताला विजयासाठी २५ धावांची आवश्यकता होती. फलंदाजी करणाऱ्या धोनीने डीप फाइन लेगला चेंडू टोलवला आणि त्याने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गप्टिलने चेंडूवर झेप घेत एक स्टंप दिसत असतानाही अचूक फेकी करत धोनीला धावबाद केले. अवघ्या काही सेंटीमीटर अंतराने धोनी बाद झाला. धोनीला धावबाद करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गप्टिल म्हणतो, ‘चेंडूची गती खूपच संथ झाली होती. त्यामुळेच मी जितक्या जलद धावत जाऊन तो पकडता येईल असा प्रयत्न करत तो चेंडू उचलला आणि थेट स्टंपच्या दिशेने फेकला. तो अगदी सरळ जाऊन स्टंपला लागला. आमचं नशीब आहे की त्या चेंडूने थेट स्टंपचा वेध घेतला. आमच्यासाठी तो क्षण निर्णायक ठरला.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सामन्यानंतर बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही धोनी धावबाद झाला तेव्हाच आम्ही समाना गमावल्याचे मत नोंदवले. ‘रवींद्र जडेजाने सामना वाचवण्यासाठी झुंजार प्रयत्न केले. महेंद्रसिंह धोनीसह त्याने महत्त्वाची भागीदारी केली. परंतु धोनी धावचीत झाला आणि सामना आपल्या हातून निसटला,’ असं कोहलीने सांगितले.