करोनाची लस आल्यानंतर ती मध्यप्रदेशच्या जनतेला मोफत देणार अशी मोठी घोषणा आज मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. ज्यावेळी करोनाची लस येईल त्यावेळी ती मध्यप्रदेशच्या जनतेला मोफत देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. करोनापासून बचाव व्हावा यासाठी मध्यप्रदेश सरकारने अनेक प्रभावी योजना राबवल्या आहेत. त्यामुळेच आज मध्यप्रदेशात करोना नियंत्रणात आहे. भारतात करोनावर लस संशोधनाचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. करोनावरची लस येताच मध्यप्रदेशच्या जनतेला ती मोफत दिली जाईल असं शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे.

आजचा बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपाने निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये इतर आश्वासनं आहेतच त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं आश्वासन आहे ते म्हणजे बिहारच्या जनतेला करोनाची लस मोफत देण्याचं. ११ संकल्प असलेला हा जाहीरनामा आहे त्यातलं पहिलं आश्वासन आहे ते म्हणजे बिहारच्या जनतेला मोफत लस देण्याचं. हा जाहीरनामा आजच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी यावर चांगलीच टीकाही केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीरनाम्यामध्ये करोनाची लस बिहारच्या जनतेला मोफत देण्याचं आश्वासन दिलं आहे. आता त्यापाठोपाठ ज्यावेळी लस येईल त्यावेळी मध्यप्रदेशच्या जनतेला ती मोफत देण्यात येईल अशी घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे.