RJD Leader Tore Clothes Over Denied Ticket: बिहार विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते मदन शाह यांनी कपडे फाडून घेतले होते. त्यावेळी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता बिहार विधानसभेच्या निकालानंतर मदन शाह यांनी रविवारी पक्षाच्या निवडणुकीतील पराभवामुळे वेदना होत असल्याचे म्हटले आहे.

“पक्षाचा पराभव झाला हे पाहून मला वाईट वाटले, पण देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. यावेळी तिकीट वाटपाबाबत लालूजींशी सल्लामसलत करण्यात आले नव्हते”, असे मदन शाह यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.

यावेळी मदन शाह यांनी अशीही टिप्पणी केली की, त्यांनी “शाप” दिला होता की, राष्ट्रीय जनता दल या निवडणुकीत २५ पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही. निकालानंतर त्यांचे शब्द खरे ठरल्याचे दिसून येत आहे, कारण या निवडणुकीत महाआघाडीला ३५ तर राष्ट्रीय जनता दलाला २५ जागांवरच विजय मिळाला.

निवडणुकीपूर्वीच्या घटनेचा उल्लेख करताना मदन शाह म्हणाले की, त्यावेळी त्यांना खूप दुःख होते. त्यामुळे त्यांनी निराश होऊन स्वतःचे कपडे फाडले होते.

तिकीटासाठी त्यांना २.७ कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावर बोलताना मदन शाह यांनी स्पष्ट केले की, ही मागणी थेट त्यांना करण्यात आली नव्हती.

बिहार निवडणुकीत काय घडले?

भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दलाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.

भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दलाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.

एनडीएने जिंकलेल्या २०२ जागांपैकी भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) लढवलेल्या २९ जागांपैकी १९ जागा जिंकल्या, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या.