नवी दिल्ली : काँग्रेसमधील पक्षाध्यक्ष निवडणुकीमध्ये केलेल्या गैरप्रकाराच्या आरोपांवरून निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी पराभूत उमेदवार शशी थरूर यांच्यावर टीका केली. तुमच्या आमच्यासमोरचा चेहरा वेगळा होता, माध्यमांसमोरचा वेगळा होता अशा शब्दांत मिस्त्री यांनी हल्लाबोल केला.

पक्षाध्यक्ष निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप थरूर यांच्या पाठीराख्यांनी केला होता. याबाबत पाठवलेल्या पत्रात राज्यातील सर्व मते बाद करण्याची मागणीही केली होती. त्यावर प्रतिक्रिया देता मिस्त्री म्हणाले की, या पत्रानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिल्याचे थरूर यांनी मान्य केले होते. मात्र आमच्याकडे येण्यापूर्वी हे सर्व मुद्दे माध्यमांमध्ये चर्चिले गेले. तुम्ही राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न केला. सर्व निवडणूक प्रक्रिया अन्याय करणारी आहे, असे चित्र निर्माण केले गेले, अशा शब्दांत मिस्त्री यांनी थरूर यांच्यावर तोफ डागली.

तुम्हाला (थरूर यांना) आणि खरगे या दोघांनाही मतदारांची यादी दूरध्वनी क्रमांकासह देण्यात आली होती. तुम्ही मतपत्रिकेत नावापुढे ‘१’ आकडा लिहिण्यास आक्षेप घेतल्यानंतर त्यात बदल करून खूण करण्याचे आदेश दिले गेले. तरीही तुम्ही निवडणूक समिती अन्याय करत असल्याची ओरड माध्यमांमध्ये केलीत.

– मधुसूदन मिस्त्री, निवडणूक समिती अध्यक्ष