लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना काँग्रेस पक्षाला वेगवेगळ्या राज्यांत धक्क्यावर धक्के बसत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात अशोक चव्हाण या बड्या नेत्यांनी नुकतेच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष कमलनाथ हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. या चर्चेमुळे मध्य प्रदेश तसेच दिल्लीमध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, याच चर्चेवर खुद्द कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमलनाथ यांनी काय स्पष्टीकरण दिले?

माध्यम प्रतिनिधींनी कमलनाथ यांना तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना कमलनाथ म्हणाले की, पक्षबदलाचा माझा काही विचार असेल तर त्याची माहिती मी सर्वप्रथम माध्यमांना देईन. कमलनाथ यांनी भाजपा प्रवेशाची शक्यता थेट नाकारली नाही. याबाबत विचारले असता “शक्यता नाकारण्याचा प्रश्नच नाही. माध्यमांचे प्रतिनिधी उत्साहित होत आहेत. मी मात्र उत्साहित झालेलो नाही. मात्र माझा पक्षबदलाचा काही विचार असेल तर मी तशी माहिती देईल,” असे कमलनाथ यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपासून छिंदवाडा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ हे त्यांच्या छिंदवाडा या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. ते नऊ वेळा याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. कमलनाथ यांचे पुत्र नकूलनाथ हेदखील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ साली भाजपाची लाट होती. इतर २८ जागांवर भाजपाचा विजय झाला होता. मात्र छिंदवाडा ही जागा नकूलनाथ यांनी जिंकली होती.

दिग्विजय सिंह काय म्हणाले?

कमलनथा यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. “माझी कमलनाथ यांच्याशी चर्चा झाली आहे. कमलनाथ यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही काँग्रेसपासून केलेली आहे. ते कायम गांधी घराण्याच्या बाजूने राहिलेले आहेत. भापजाने जेव्हा इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकले होते, तेव्हा ते गांधी घराण्यासोबतच होते. अशी व्यक्ती काँग्रेस आणि गांधी घराण्याला सोडून जाईल, असे तुम्हाला वाटते का?” अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंह यांनी दिली.

कमलनाथ यांना राहुल गांधींचा विरोध

विधानसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवानंतर राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा कमलनाथ यांना होती. मात्र तसे झाले नाही. राहुल गांधी यांनीदेखील कमलनाथ यांना उमेदवारी देण्यास विरोध केल्याचा दावा केला जातोय. या सर्व कारणांमुळे कमलनाथ हे नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर कमलनाथ यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांना मध्य प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपाने २३० जागांपैकी एकूण १६३ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला अवघ्या ६६ जागांवर विजयी होता आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh congress leader kamalnath comment on possibility of joining bjp prd
First published on: 17-02-2024 at 17:01 IST