पीटीआय, भोपाळ

गेल्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका झालेल्या राज्यांचा विचार केला तर मध्य प्रदेशात भाजपला यश आले. या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवले होते. लोकसभा निवडणुकीतही या राज्यातील सर्व २९ जागा जिंकत भाजपच सरस ठरला आहे.

एकीकडे उत्तर प्रदेशात भाजपला धक्का बसलेला असताना मध्य प्रदेशने सर्व २९ जागा जिंकत भाजपला दोनशेचा आकडा ओलाडूंन देण्यात मोलाची कामगिरी बजावली. राज्यात काही महिन्यांपूर्वीच निवडणूक झाली होती. राज्यात भाजपचे संघटन भक्कम असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतून दिसला. छिंदवाडा येथील जागा जिंकत भाजपने ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांना धक्का दिला. याखेरीज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनाही पराभव पत्करावा लागला.

कर्नाटक, तेलंगणमध्ये काँग्रेसचे वर्चस्व

दक्षिणेतील कर्नाटक तसेच तेलंगण या काँग्रेसच्या ताब्यातील दोन महत्त्वाच्या राज्यांचा विचार केला तर, पक्षाने वर्चस्व राखले. कर्नाटक हे दक्षिणेतील तमिळनाडूनंतर २८ जागा असलेले राज्य. गेल्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसला एकमेव जागा जिंकता आली होती. मात्र यंदा काँग्रेसने नऊ जागा जिंकत कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली. भाजपने एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युती करत वोक्कलिगा मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न केला. भाजपला १७ जागा मिळाल्या. गेल्या वेळच्या २५ जागांच्या तुलनेत भाजपच्या ८ जागा कमी झाल्या. तर जनता दलाला दोन जागा जिंकता आल्या.

हेही वाचा >>>उत्तर प्रदेशात भाजपचे गर्वहरण; दलितमुस्लीम आणि ओबीसींच्या पाठिंब्यामुळे ‘इंडिया’ची सरशी

कर्नाटकप्रमाणे तेलंगणमध्ये भाजप व काँग्रेस प्रत्येकी आठ जागांवर विजयी झाले. तर एमआयएमने हैदराबादची जागा राखली. मात्र सत्ता असल्याने तेलंगणमध्ये किमान दोन आकडी जागांची अपेक्षा त्यांना होती. तरीही गेल्या वेळच्या तुलनेत त्यांनी पाच जागा अधिक आणल्या. तर भाजपने गेल्या चारवरून यंदा आठ जागांवर मजल मारली. भारत राष्ट्र समितीला एकही जागा मिळाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजस्थानमध्ये असंतोषाचा भाजपला फटका

राजस्थानमध्ये सर्व २५ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा केवळ चौदा जागा जिंकता आल्या. सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली. मात्र यंदा विविध समाजघटकांची नाराजी भाजपला भोवली. काँग्रेसने आठ जागा जिंकत भाजपला धक्का दिला. विशेष म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यात खाते उघडले. भाजपने राज्यात मुख्यमंत्रीपद वसुंधराराजे यांच्या न सोपवता भजनलाल शर्मा यांच्यासारख्या नवख्या नेत्याकडे सूत्रे दिली. मात्र निकालातून भाजपला फटका बसल्याचे दिसले.