Crime News : एका ३५ वर्षीय महिलेची गळा चिरुन आणि चाकूचे वार करुन हत्या करण्यात आली. या महिलेने लग्नाला नकार दिला होता आणि इस्लाम धर्मात धर्मांतर करुन घ्यायलाही नकार दिला होता त्यामुळे ही हत्या करण्यात आली. मध्य प्रदेशातील नवारा भागातली ही धक्कादायक घटना आहे. भाग्यश्री असं या महिलेचं नाव आहे. तिच्यावर शेख रईसने हल्ला केला आणि तिची गळा चिरुन आणि चाकूचे वार करुन तिची हत्या केली. या प्रकरणी शेख रईसला काही तासांमध्ये अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.
भाग्यश्रीच्या बहिणीने काय सांगितलं आहे?
भाग्यश्रीची बहीण सुभद्राने सांगितलं की रईस शेखने तिला केस पकडून ओढलं. त्यानंतर तिला मारहाण केली, तिला शारिरीक त्रास दिला. धर्मांतर कर आणि लग्नाला होकार दे असं सांगत होता. गेल्या काही दिवसांपासून तो हे करत होता. माझ्या बहिणीने लग्नाला आणि धर्मांतराला नकार दिला त्यामुळे रईसने तिची हत्या केली. भाग्यश्रीचा गळा रईस शेखने चिरला आणि तिच्यावर वार केले त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांनी या प्रकरणी नेमकी काय माहिती दिली?
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंतर सिंग यांनी असं सांगितलं की या प्रकरणी आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी आम्ही करत आहोत. त्याच्यावर हत्या, मारहाण आणि धर्मांतराचा दबाव या संबंधीची कलमं लावण्यात आली आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. या घटनेनंतर नवारा भागामध्ये हिंदू संघटनांनी आंदोलन केलं आहे.
आंदोलक अमित वरुदे यांनी या प्रकरणी काय म्हटलंय?
हिंदू संघटनेचे आंदोलक अमित वरुदे यांनी म्हटलं आहे की हे सरळ सरळ लव्ह जिहादचं प्रकरण आहे. भाग्यश्रीने तीन दिवसांपूर्वीच पोलिसात तक्रार केली होती. मात्र तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळेच तिची हत्या करण्यात आली असा आरोप आंदोलकांनी केला आहे. हिंदू संघटनांनी या हत्येचा निषेध नोंदवत या भागातली दुकानंही बंद केली. तसंच मध्य प्रदेशच्या माजी मंत्री अर्चना चिटणीस यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. अर्चना चिटणीस यांनी भाग्यश्रीच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जावी आणि कठोरातली कठोर शिक्षा आरोपीला केली जावी अशी मागणी चिटणीस यांनी केली आहे.