नवी दिल्ली : दूरचित्रवाणीवरील महाभारत या प्रसिद्ध मालिकेत भीमाची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू प्रवीण कुमार सोब्ती यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले.

७४ वर्षीय प्रवीण कुमार यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी रात्री नवी दिल्लीतील अशोक विहार भागातील त्यांच्या निवासस्थानी डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मूळचे पंजाबमधील अमृतसरचे असलेले प्रवीण कुमार वयाच्या २०व्या वर्षी सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) दाखल  झाले.  थाळीफेक आणि हातोडाफेक या क्रीडाप्रकारांत त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. १९६६ आणि १९७०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी थाळीफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, तर १९६६च्या स्पर्धेत हातोडाफेकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. त्याच वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हातोडाफेक खेळात त्यांनी रौप्यपदक पटकावले होते. १९६८च्या मेक्सिको आणि १९७२च्या म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेत ते सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९८८मध्ये बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत त्यांनी साकारलेल्या भीम या भूमिकेमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी ‘युध’, ‘अधिकार’, ‘हुकुमत’, ‘शहेनशहा’, ‘घायल’, ‘आज का अर्जुन’ यांसह ५० विविध चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. २०१३मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी २०१४मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी दु:ख व्यक्त केले. ‘आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे क्रीडापटू आणि अभिनेते प्रवीण कुमार यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायक आहे. मी याबाबत मनापासून शोक व्यक्त करतो,’ असे रिजिजू म्हणाले.