CP Radhakrishnan Elected As Vice President Of India: भारताच्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. यात एकूण ९८ टक्के मतदान झाले. यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे उमेदवार जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी एकतर्फी विजय मिळवला.

यासाठी आज सकाळी १० वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल आणि किरेन रिजिजू, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, भाजपा खासदार कंगना राणावत आणि सपा नेते राम गोपाल यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदान केले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही निवडणुकीत मतदान केले.

दरम्यान, यामध्ये भारत राष्ट्र समिती (४ राज्यसभा खासदार), बिजू जनता दल (७ राज्यसभा खासदार) आणि शिरोमणी अकाली दल (१ लोकसभा आणि २ राज्यसभा खासदार) यांनी मतदानात भाग घेतला नाही. २१ जुलै रोजी माजी उपाध्यक्ष जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करण्यास पात्र होते. इलेक्टोरल कॉलेजमध्ये एकूण ७८८ सदस्य आहेत. त्यापैकी २४५ राज्यसभेचे आणि ५४३ लोकसभेचे आहेत. सध्या या सदस्यांची एकूण संख्या ७८१ आहे, कारण राज्यसभेत ६ आणि लोकसभेत १ जागा रिक्त आहे. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी ३९१ मतांची आवश्यकता होती.

राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार सी. पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली. तर विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मते मिळाली.

या विजयासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले. ते एक्सवर म्हणाले, “भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन. तळागाळातून वर आलेले नेते म्हणून तुमची विवेकबुद्धी आणि प्रशासनाबद्दलचे सखोल ज्ञान आपल्याला आपल्या संसदीय लोकशाहीतील सर्वोत्तम गोष्टी करण्यासाठी मदत करेल असा माझा ठाम विश्वास आहे. वरिष्ठ सभागृहाच्या पावित्र्याचे रक्षक म्हणून तुमच्या प्रवासासाठी मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो.”