गेल्या चार-पाच महिन्यांपासून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार निर्णय घेत असून, भ्रष्टाचार करत आहे. हे राज्याच्या आणि देशाच्याही हिताचं नाही. भविष्यात कोणते आदर्श आपण निर्माण करत आहोत, हे महाराष्ट्रातील प्रकरणाने जगासमोर जाणार आहे. देशात न्यायव्यवस्था आहे की नाही, हे शिवसेनेच्या खटल्यावरून सिद्ध होईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. आमची बाजू न्यायाची आणि सत्याची आहे. ‘सत्यमेव जयते’ हे बिरुद तेजाने तळपणारे असेल, तर आम्हाला कायद्याच्या चौकटीतला न्याय मिळेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेना फूटप्रकरणी आज ( १० जानेवारी ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊत दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडून आमदार पळवून नेण्यात आलं. पैशांचा वारेमाप वापर करण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या तारखांना आम्ही सामोरं जात आहोत. संपूर्ण देशांचं लक्ष लागलेल्या निकालाबद्दल तारखांवर-तारखा पडत असून, घटनाबाह्य सरकार मिश्कीलपणे हसत आहे. महाशक्ती आमच्या पाठीशी असून, कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, असं त्यांना वाटत आहे. पण, देशातील न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
“सरकारचा मृत्यू ठरलेला आहे”
“एखाद्या राज्यात घटनाबाह्य सरकार चालत असेल, तर ते रोखणं न्यायालयाचं काम आहे. घटनेनुसार हे झालं असतं, तर सरकार केव्हाचं पडलं असतं. सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. कारण, हा मुडद्यात फुंकलेला प्राण आहे. हे जिवंत सरकार नाही आहे. कोणतेही अडथळे आणले नाहीतर सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले.
“उद्या आमच्यावर तुम्ही…”
“वैभव नाईक, राजन साळवी आणि नितीन देशमुखांना एसीबीने नोटीस बजावली आहे. आम्ही ईडी आणि न्यायालयाच्या चक्रातून बाहेर पडलो आहोत. आमच्या अनेक लोकांवर चौकशीच्या तलवारी लटकलेल्या आहेत. नागपूरच्या अधिवेशनात सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांचे कोट्यवधीचे घोटाळे बाहेर काढले. ते एसीबीला दिसत नाही का? आमच्या लोकांवर दबाव आणण्यासाठी चौकशा करण्यात येत आहेत. उद्या आमच्यावर तुम्ही देशद्रोहाचे गुन्हे दाखल कराल. देशात आणि महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वात असुरक्षित राज्य झालं आहे. कारण, कोणालाही कधीही तुरुंगात टाकलं जाईल. मंत्री तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देत आहेत,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.