राज्यात वेगवान घडामोडी घडत असताना फडणवीस दिल्लीत दाखल; एकनाथ शिंदेंसोबत भेटीची शक्यता, चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत

Devendra Fadanvis

राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदेही दिल्लीला जाण्याची शक्यता

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेदेखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. गुवाहाटीत बंडखोर आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे रवाना होण्याची शक्यता आहे. बैठकीदरम्यान यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होऊ शकते अशी चर्चा आहे.

भाजपाने महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधला – खासदाराचा दावा

काँग्रेसचे खासदार नासीर हुसेन यांनी भाजपाने महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांशीही संपर्क साधल्याचा दावा केला आहे. “गेल्या काही दिवसात भाजपाकडून आमच्या आमदारांशी संपर्क साधण्यात आला. राष्ट्रवादी आणि अपक्ष आमदारांनाही गळ घालण्यात आली. पण आमच्या आमदारांनी नकार दिला,” असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी बंडखोर आमदार पुन्हा एकदा शिवसेनेत परत येतील आणि लवकरच तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. “आतापर्यंत कोणीही अविश्वास प्रस्ताव मांडलेला नाही, मग राज्यपाल विश्वासदर्शक ठरावासाठी कसे बोलावू शकतात?.” अशी विचारणाही त्यांनी केली.

लवकरच मुंबईला जाणार – एकनाथ शिंदे

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच गुवाहटीमधील हॉटेलबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे समर्थक गटाचे दावे फेटाळले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत म्हणणाऱ्यांनी नावं सांगावी, असं खुलं आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. तसंच आपण लवकरच मुंबईला जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले, “दीपक केसरकर आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. ते माध्यमांना वेळोवेळी माहिती देतील. गुवाहटीमधील सर्व आमदार अगदी आनंदात आहेत. बाहेरून काही लोक गुवाहटीतील आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा करत आहेत. मात्र, त्यांनी कोणते आमदार संपर्कात आहेत ती नावं सांगावी. त्यानंतरच यावर स्पष्टता येईल.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra political crisis bjp devendra fadanvis delhi eknath shinde amit shah sgy

Next Story
“सारा देश देख राहा है, गुवाहाटी में छुपे गद्दारोको, माफी…”; सेनेच्या बंडखोरांविरोधात गुवाहाटीत NCP ची कट्टपा-बहुबली स्टाइल बॅनरबाजी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी