प्रजासत्ताक दिन सांगता समारंभ यंदा ‘अबाईड विथ मी’विना

इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीच्या विलीनीकरणानंतर केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आवडत्या ‘अबाईड विथ मी’ या ख्रिस्ती भजनाची धून यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून वगळली आहे.भारतीय लष्कराने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रम पत्रिकेतून ही बाब उघड झाली.  प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभाद्वारे (बिटिंग द रिट्रीट)  तिन्ही सेना दलांना आपआपल्या बराकींमध्ये परतण्याचा अधिकृत संदेश दिला जातो. या समारंभात तिन्ही सेना दले सहभागी होतात आणि पारंपरिक धून वाजवत माघारी फिरतात. या सर्व धून लष्कराच्या बॅण्डद्वारे वाजवण्यात येतात. त्यांत ‘अबाईड विथ मी’चाही समावेश होता.

‘अबाईड विथ मी’ ही पद्यरचना महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनांपैकी एक आहे. स्कॉटिश कवी हेन्री फ्रान्सिस लाईट यांनी लिहिलेल्या या भजनाच्या धूनचा समावेश १९५०पासून प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभात करण्यात येत होता. या समारंभाच्या अखेरीस ‘अबाईड विथ मी’ची धून वाजवण्यात येत होती, परंतु यंदा ‘सारे जहाँ से अच्छा’ ही धून वाजवण्यात येईल, असे लष्कराच्या कार्यक्रम पत्रिकेत म्हटले आहे.

विजय चौकात होणाऱ्या या समारंभात २६ धून वाजवण्यात येणार आहेत. त्यांत जय जनम भूमी, वीर सियाचेन, अमर चट्टान, गोल्डन अ‍ॅरोज, स्वर्ण जयंती, वीर सैनिक, जय भारती, हिंद की सेना, कदम कदम बढाए जा, ए मेरे वतन के लोगों आदी धूनचा समावेश आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीला हलवून तिचे विलीनीकरण राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये केले होते. त्याबद्दल काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या, तर काँग्रेसने टीकेची झोड उठवत अमर जवान ज्योत पुन्हा इंडिया गेटवर प्रज्ज्वलित करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

गौरवलेली पद्यरचना…

ब्रिटनचे राजे जॉर्ज पंचम यांचीही ही आवडती धून होती. १९व्या शतकातील प्रख्यात कवी अल्फ्रेड टेनिसन यांनी इंग्रजीतील उत्तम पद्यरचनेपैकी एक असे ‘अबाईड विथ मी’चे वर्णन केले होते.

झाले काय?

प्रजासत्ताक दिनाचा सांगता समारंभ (बिटिंग द रिट्रीट) २९ जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित केला जातो. यंदा या समारंभात महात्मा गांधी यांना प्रिय असलेली ‘अबाईड विथ मी’ची धून वाजवली जाणार नाही. लष्कराच्या कार्यक्रम पत्रिकेतून ही बाब उघड झाली.

थोडा इतिहास…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्कॉटिश कवी हेन्री फ्रान्सिस लाईट यांनी लिहिलेल्या अनेक भजनांपैकी ‘अबाईड विथ मी’ सर्वाधिक लोकप्रिय झाले. हे भजन त्यांनी सन १८४७च्या जुलै – ऑगस्टमध्ये लिहिल्याचे मानले जाते. १८६१मध्ये ‘हाईम अ‍ॅन्शंट अ‍ॅण्ड मॉडर्न’च्या प्रकाशनानंतर संपादक विल्यम मॉन्क यांनी हेन्री यांच्या शब्दांसाठी धून तयार केली.