भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधी यांना ‘बहोत चतुर बनिया’ असे संबोधित केल्यानं मी खूपच दुखावले आहे, अशी प्रतिक्रिया गांधी यांच्या नात तारा गांधी भट्टाचार्य यांनी व्यक्त केली आहे.

अमित शहा यांनी महात्मा गांधी यांना ‘बहोत चतुर बनिया…’ असे संबोधित केले होते. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली. शहा यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली. याशिवाय सोशल मीडियावरूनही अनेकांनी शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. काँग्रेसनेही शहा यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. शहा हे सत्तेचे व्यापारी आहेत. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांचाही अपमान झाला आहे. देशाची फाळणी करण्यासाठी ब्रिटिशांनी ज्याप्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेचे सहकार्य घेतले, त्याचप्रकारे हे केंद्र सरकार उद्योजकांना झुकते माप देऊन देशात विषमता निर्माण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता. तसेच ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. शहा यांचे हे वक्तव्य अनुचित आणि अनैतिक आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. भाजप आणि संघाची गांधीजींविषयी काय भावना आहे, हे शहा यांच्या विधानाच्या निमित्ताने उघड झाले, अशी टीका माकपने केली होती. जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी शहा यांच्यावर टीका केली असताना दिल्लीत सोमवारी महात्मा गांधी यांच्या नात तारा गांधी भट्टाचार्य यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमित शहांनी महात्मा गांधीजींबद्दल केलेल्या वक्तव्यानं मी दुखावले आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत आणि एक भारतीय नागरिक असल्याच्या नात्यानं मीही निष्पक्ष प्रतिक्रिया देऊ इच्छित आहे. महात्मा गांधींजींविषयी बोलताना राजकीय नेत्यांनी जबाबदारीनं बोलायला हवं होतं, असंही त्या म्हणाल्या.