NEET Rank One Holder Mahesh Kumar: राजस्थानच्या महेश कुमारने नीट २०२५ परीक्षेत ऑल इंडिया रँक १ मिळवला असून, त्याने पहिल्याच प्रयत्नात ७२० पैकी ६८६ गुण मिळवले आहेत. ३ ऑगस्ट २००८ रोजी राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात जन्मलेला महेश गेल्या तीन वर्षांपासून सिकर येथे नीट परीक्षेची तयारी करत होता. त्याचे आई-वडील सरकारी शिक्षक असून, त्यांनीच त्याला परीक्षेसाठी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महेशने त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या पालकांना दिले आहे. सुरुवातीपासूनच शिक्षणात गती असलेल्या महेशने दहावीत ९७.१७% आणि बारावीत ९०.८०% गुण मिळवले होते.

“सुरुवातीला, मला अकरावीमध्ये मानव्यविद्या (Humanities) विषय घ्यायचा होता आणि नंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करायची होती. पण माझी मोठी बहीण सिमरनने मला जीवशास्त्र विषय (Biology) निवडण्यासाठी आणि यूपीएससी ऐवजी नीट परीक्षेसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले”, असे महेशने सांगितले.

क्रिकेट खेळणे आणि टेलिव्हिजन पाहण्यासाठीही…

आता सर्जन झाल्यानंतर एम्स दिल्लीमध्ये नोकरी मिळवण्याचे महेशचे स्वप्न आहे. त्याच्या अभ्यासाच्या दिनचर्येबद्दल विचारले असता, महेश म्हणाला, “मी दररोज ६ ते ८ तास अभ्यास करायचो. क्रिकेट खेळणे आणि टेलिव्हिजन पाहणे यासारख्या गोष्टींसाठीही मी वेळ काढयचोय. ब्रेक घेणे आणि बर्नआउट टाळणे महत्वाचे आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याने मला सामान्य चुका समजण्यास मदत झाली आणि जेव्हा जेव्हा मी अडकायचो तेव्हा मला नेहमीच माझ्या शिक्षकांची मदत व्हायचीय.”

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, राजस्थानमधील चार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा २०२५ मध्ये टॉप २० रँकमध्ये स्थान मिळवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा एकाही उमेदवाराला पैकीच्या पैसी गुण नाहीत

दरम्यान गेल्या वर्षी सुधारित नीट-यूजी निकालांमध्ये १७ उमेदवारांनी ७२० गुण मिळवल्यानंतर, या वर्षीचे सर्वोच्च गुण ६८६ पर्यंत घसरले असून, या परीक्षेत एकाही उमेदवाराला पूर्ण ७२० गुण मिळाले नाहीत. या वर्षीच्या निकालांमध्ये राजस्थानचा महेश कुमार हा एकमेव टॉपर आहे, ज्याने ९९.९९९९५४७ टक्केवारी मिळवली. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) शनिवारी जाहीर केलेल्या नीट-यूजी निकालांनुसार, मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधिया याने ९९.९९९९०९५ टक्केवारीसह दुसरा क्रमांक मिळवला आहे.