बाईकप्रेमींसाठी ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’ कंपनीने खूशखबर आणली आहे. कंपनी या आठवड्याच्या अखेरीस मोटारसायकलमधील प्रसिध्द ब्रॅण्ड ‘जावा’ भारतात आणत आहे. भारतातील आपल्या टू-व्हिलर्स व्यवसायात वृध्दी करण्यासाठी कंपनीने मोटारसायकल ब्रॅण्ड ‘बीएसए’ आणि ‘जावा’चे अधिग्रहण केले आहे. ‘बीएसए’ आणि ‘जावा’च्या अधिग्रहणाने भारतीय बाजारातील दुचाकी क्षेत्रात आपले स्थान मजबूत करणार असल्याचे कंपनीचे मानणे आहे. २८ कोटी रुपयांत कंपनीने बीएसएचे अधिग्रहण केले असून, गत वर्षी महिंद्राने ‘पूजॉ’ मोटारसायकल ब्रॅण्ड खरेदी केला होता. महिंद्राची सहयोगी कंपनी ‘क्लासिक लिजेंड्स’ने ‘बीएसए’ ब्रॅण्डची खरेदी केली आहे. या कंपनीत महिंद्राचे ६० टक्के शेअर्स आहेत.
ऐतिहासिक मूल्य असलेले हे दोन ब्रॅण्ड जगभरात अनेक ठिकाणी ओळखले जातात. ‘बीएसए’ची ख्याती या ब्रॅण्डची गुणवत्ता सिध्द करते, तर देशातील ग्राहकांच्या पसंतीच्या ‘जावा’ ब्रॅण्डची स्थानिय बाजारात आपली अशी वेगळी ओळख आहे. दुचाकी बाजारातील आमच्या नवीन प्रवासासाठी आम्ही उत्साही आहोत. क्लासिक लिजेंड्सच्या माध्यमातून प्रीमियम सेगमेंटअंतर्गत ‘बीएसए’ आणि ‘जावा’सारखे ब्रॅण्ड पुन्हा एकदा जिवंत होणार असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. पवन गोयंका यांनी सांगितले.
‘जावा’चा मैसूरमध्ये प्लांट होता. या ब्रॅण्डचे ‘जावा २५०’ हे सर्वाधिक खपाचे लोकप्रिय मॉडेल होते. आजही देशातील अनेक लोकांकडे ही बाईक पाहायला मिळते. १९९६ मध्ये ही कंपनी बंद पडली. महिंद्राने या ब्रॅण्डचे प्रत्यक्ष अधिग्रहण केले नसले तरी भारतात या बाईकची निर्मिती करण्याचे लायसन्स प्राप्त केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ‘ऑटो एक्स्पो २०१८’ मध्ये या मॉडेलची एक झलक पाहायला मिळेल अशी आशा वर्तवली जात आहे. मोटारसायकलवर महिंद्राचे ब्रॅण्डींग करण्यात येणार नाही. भारतात ‘जावा’ ब्रॅण्डचा विकास करणार असून, पिथमपूर प्लांटमध्ये मोटारसायकलची निर्मिती करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.