Rape Threat to BJD MP Sulata Deo: बिजू जनता दल पक्षाच्या महिला खासदार सुलता देव यांनी १७ ऑगस्ट रोजी एक्सवर एक पोस्ट शेअर करत धक्कादायक आरोप केला होता. महिंद्रा कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं आपल्यावर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा खासदार सुलता देव यांनी केला होता. तसेच या प्रकरणावर पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत, असे त्यांनी म्हटले होते. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना टॅग केले होते. आता महिंद्रा ग्रुपने यावर अधिकृत भूमिका मांडली आहे.
सुलता देव यांनी काय आरोप केला?
सुलता देव यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले, नाशिकमध्ये महिंद्रा कंपनीत काम करणारा कर्मचारी आणि भाजपाचा कथित कार्यकर्ता एका महिला खासदारावर बलात्कार करण्याची आणि तिला जीवे मारण्याची उघड धमकी देत आहे. खासदाराबरोबर हे होत असेल तर देशातील सामान्य महिलांची परिस्थिती कशी असेल?
या पोस्टसह सुलता देव यांनी काही स्क्रिनशॉटही जोडले आहेत.

प्रकरण काय आहे?
२ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील एस्म रुग्णालयात ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात पीडित अल्पवयीन मुलीच्या जबाबाचा एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला होता. या व्हिडीओच्या पोस्टला कमेंट करताना सदर धमकी दिल्याचे सुलता देव यांनी सांगितले आहे.
दरम्यान या व्हिडीओची सत्यता पोलीस पडताळत आहेत. सदर व्हिडीओ कुणी काढला आणि व्हायरल केला, याचा शोध घेतला जात आहे.
महिंद्रा ग्रुपने काय प्रतिक्रिया दिली?
दरम्यान खासदार सुलता देव यांनी महिंद्रा कंपनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्याचा उल्लेख केल्यानंतर कंपनीकडून यावर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत एक्स हँडलवर ही प्रतिक्रिया उपलब्ध आहे.
“आमच्या एका कर्मचाऱ्याने फेसबुकवर एका राजकीय नेत्याला काही अनुचित संदेश पाठवल्याची बाब समोर आली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाला, धमकीला जराही थारा देत नाही. महिंद्रा ग्रुपने आपल्या स्थापनेपासूनच मानवी प्रतिष्ठेला महत्त्व दिले आहे आणि आदरात्मक वातावरण राखण्यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे अशा तत्त्वांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही”, असेही कंपनीने म्हटले.
“आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत आहोत आणि तात्काळ चौकशी सुरू करत आहोत. जर आरोप खरे ठरले तर आमच्या आचारसंहिता नियमांनुसार कारवाई केली जाईल”, असेही महिंद्रा ग्रुपने आपल्या निवेदनात म्हटले.