जम्मू-काश्मीरच्या शोपियान येथे सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडरला ठार करण्यात आले. हा दहशतवादी याआधी जम्मू-काश्मीर पोलिसात होता, त्याने ४ वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात रात्रीच्या चकमकीत इशफाक डारसह दोन दहशतवादी ठार झाले. दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये अशाच प्रकारच्या कारवाईत दोन दहशतवादीही ठार झाले होते.

काश्मीरचे पोलिस प्रमुख (आयजीपी) विजय कुमार म्हणाले की इशफाक दार उर्फ ​​अबू अक्रम हा २०१७ पासून या भागात लष्करातील टॉप दहशतवाद्यांपैकी एक होता आणि पोलीस, सैन्य आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या संयुक्त कारवाईत त्याला ठार मारण्यात आले.

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोपियानच्या चेक सादिक खान भागात संयुक्त कारवाई सुरु केली. या कारवाईचे रुपांतर चकमकीत झाले. ज्यात दोन दहशतवादी ठार झाले. अद्याप कारवाई सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.

इश्फाक दार उर्फ ​​अबू अक्रम हा जम्मू-काश्मीर पोलिसांत होता, त्याने २०१७ मध्ये नोकरी सोडली होती. यापूर्वी शुक्रवारी श्रीनगरमधील पोलीस आणि नागरिकांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या दोन दहशतवाद्यांना श्रीनगरमधील दानमार परिसरातील आलमदार कॉलनीमध्ये सुरक्षा दलाने ठार केले होते. काश्मीरचे पोलीस प्रमुख कुमार म्हणाले की, यावर्षी जानेवारीपासून काश्मीरमध्ये ८१ दहशतवाद्यांना ठार केले गेले आहे.