Charlie Kirk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली कर्क यांची गुरूवारी युटा व्हॅली विद्यापीठात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना चार्ली कर्क यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

गोळीबारानंतरच्या गोंधळाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विद्यार्थी घाबरून पळताना दिसत आहेत. दरम्यान, चार्ली कर्क हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून एफबीआयने शूटरचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली रायफल देखील जप्त केल्याचं एफबीआयने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मारेकरी अद्याप फरार

चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार करणाऱ्या संशयिताचे फोटो जारी करत चार्ली कर्क यांच्यावर ज्या बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या ती बंदूक एफबीआयला आढळून आली आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचं एफबीआयने म्हटलं आहे. गोळीबारानंतर काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं, अशी माहिती एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली?

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गोळीबार करणारा व्यक्ती छतावरून पुढे जाऊन त्याच्या गोळीबाराच्या ठिकाणी पोहोचला आणि नंतर फरार झाला. पण संशयित व्यक्तीचे स्पष्ट व्हिडीओ फुटेज मिळाले असून तो कॉलेज वयाचा असल्याचं दिसून येत असल्यामुळे तो कॅम्पसमध्ये सहजपणे मिसळला होता. घटनास्थळावरील पावलांचे ठसे आणि इतर भौतिक ठसे यासह त्याच्या प्रयोगशाळेत त्याचे विश्लेषण सुरू आहे.

चार्ली कर्क कोण होते?

रूढीवादी विचारांची थेटपणे मांडणी करणारे चार्ली कर्क हे ट्रम्प यांचे जवळचे सहकारी होते. करोना महामारीबद्दल त्यांनी चुकीची माहिती पसरवली होती, तसेच हवामान बदल असा काही प्रकारच नसल्याचाही त्यांचा दावा होता. सीएनएनच्या वृत्तानुसार, मागच्या वर्षी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत कर्क यांच्यामुळे ट्रम्प यांना तरूणांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. याबद्दल ट्रम्प यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले होते.

कर्क यांच्या मृत्यूनंतर वृत्तवाहिनीवर बोलत असताना ट्रम्प यांनी चार्ली कर्क देशभक्त असल्याचे म्हटले. स्वातंत्र्य, लोकशाही, न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आग्रहामुळे कर्क यांनी लाखो अमेरिकन तरूणांना प्रेरित केले होते. त्यांच्या कुटुंबियाप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. तसेच मारेकऱ्यांना शोधून त्यांना योग्य शिक्षा देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी खात्री देतो, असं ट्रम्प यांनी म्हटलं.