पत्रकारितेच्या शिक्षणासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशमधील माखनलाल चुतर्वेदी पत्रकारिता विद्यापीठाने ५० एकर जागेत गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या नव्या परिसरात ५० एकर क्षेत्रात गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. गायींची संख्येबाबत अजून काही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, काँग्रेसने विद्यापीठाच्या या निर्णयाचा समाचार घेतला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला खूश करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
A new experiment. 'Gau shala' will be on around 2 acre land. This doesn't need permission from UGC: Deepak Sharma, Registrar, Makhanlal Univ pic.twitter.com/0GLKkPC0fv
— ANI (@ANI) August 23, 2017
विद्यापीठाचे कुलगुरू ब्रजकिशोर कुठियाला यांनी ‘एएनआय’शी बोलताना ही माहिती दिली. विद्यापीठाच्या नवीन परिसरात आमच्याकडे ५० एकर जमीन असेल. यामध्ये सुमारे २ एकर अशी जमीन आहे की, त्याचा वापर कशासाठी करावा हे आम्ही अजून निश्चित केलेले नाही. यावर अनेकांना आपापल्या कल्पना सुचवल्या. यातीलच एक गोशाळा सुरू करण्याची कल्पना होती. यावरच आम्ही आता काम सुरू केले आहे, असे कुठियाला म्हणाले. हा नवीन प्रयोग असून यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परवानगीची गरज नसल्याचे विद्यापीठाचे रजिस्ट्रार दीपक शर्मा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या या निर्णयाची काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते पंकज चुतर्वेदी यांनी टीका केली आहे. कुटियाला हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील आपल्या गुरूंना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पत्रकारिता विद्यापीठाचा अर्थ काय असा सवाल करत विद्यार्थी विद्यापीठात पत्रकारिता शिकण्यासाठी येणार की गोसेवा करणार, असे ते म्हणाले.