कोचीजवळ अपघात; कमी वेगामुळे प्राणहानी टळली
मंगळुरूकडे जाणाऱ्या मलबार एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरून केरळात रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे. पावसामुळे हा अपघात झाला असून कोचीपासून ४५ कि.मी अंतरावर कारूकुट्टी येथे हा अपघात झाला आहे. अर्नाकुलमकडे येणाऱ्या चेन्नई-त्रिवेंद्रम या गाडीशी मलबार एक्स्प्रेसची टक्कर झाली असती पण अपघातानंतर ती गाडी ३०० मीटर लांब आहे तिथेच थांबवण्यात आली त्यामुळे अनर्थ टळला असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पहाटे २.५५ वाजता हा अपघात झाला असून त्यात १६३४७ तिरूअनंतपुरम मंगळुरू मलबार एक्स्प्रेस अलुवा स्टेशनवरून निघाली. ती कमी वेगाने जात होती त्यामुळे प्राणहानी झाली नाही. प्रवाशांना त्रिचूर येथून पुढील प्रवासास जाऊ देण्यात आले. दक्षिण रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक पी.के.मिश्रा यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांचे सहकारी त्यांच्या समवेत होते. त्यांनी सांगितले की, सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. एका महिलेला खांद्यास दुखापत झाली असून तिला प्रथमोपचारानंतर सोडण्यात आले. तिरूअनंतपुरम येथे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, घसरलेले डबे एकमेकांपासून विलग झाले नाहीत त्यामुळे कुणाला दुखापत झाली नाही. अर्नाकुलमकडे येत असलेल्या गाडीला ती ३०० मीटर अंतरावर असतानाच अपघाताचा संदेश मिळाल्याने दोन रेल्वेंच्या टकरीचा धोका टळला. अर्नाकुलम-त्रिचूर मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली असून २१ गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. अर्नाकुलम मार्गावर सायंकाळी सहापर्यंत तर त्रिचूर मार्गावर उद्या सकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत होईल असे मिश्रा यांनी सांगितले. मुख्यमंत्री विजयन यांनी अपघातानंतर प्रवाशांची व्यवस्था खास रेल्वे व बस पाठवून केली. रेल्वे मार्गात दोष असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताच्या वेळी जोरदार पाऊस चालू होता.