इस्लामाबाद : पाकिस्तानातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी आणि नोबेल पारितोषिक विजेती पाकिस्तानी तरुणी मलाला युसुफझाई गुरुवारी पहाटे मायदेशी अर्थात पाकिस्तानात परतली. पाच वर्षांपेक्षाही अधिक काळ ती देशाबाहेर राहत होती. तालिबानी दहशतवाद्यांनी तिला यापूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानी जिओ न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
https://twitter.com/ANI/status/979119806728359937
मलाला दुबईहून पाकिस्तानातील बेनझिर भुत्तो आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी सुखरुप लँड झाली. पाकिस्तानात परतल्यानंतर ती पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी तसेच लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि इतरही विविध क्षेत्रातील लोकांची भेट घेणार आहे. मलाला विमानातून उतरली तेव्हा ती आपल्या पारंपारिक वेशात होती.
चार दिवसांच्या दौऱ्यासाठी ती मायदेशात ‘मिट मलाला’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे आली आहे. ऑक्टोबर २०१२मध्ये १५ वर्षांची मलाला पाकिस्तानातील महिला आणि लहान मुलींच्या शिक्षणांदर्भात काम करीत असल्याने तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला चढवला होता. यामध्ये तिच्या डोक्याला गोळी चाटून गेली होती. त्यानंतर पाकिस्तानातील पेशावरच्या मिलिटरी रुग्णालयात तीला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तिला लंडनमध्ये चांगल्या उपचारांसाठी पाठवण्यात आले. मलाला सारख्या शाळकरी मुलीवर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा त्यावेळी जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता.
मुस्लिम महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालाला २०१४मध्ये शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात आले होते.