Rini Ann George vs Rahul Mamkootathil: मल्याळम अभिनेत्री आणि माजी टीव्ही पत्रकार रिनी ॲन जॉर्ज यांनी बुधवारी एका राजकीय नेत्यावर आरोप केले होते. या नेत्याचे नाव त्यांनी घेतले नसले तरी विरोधकांनी काँग्रेसचे आमदार आणि तरूण तडफदार नेते राहुल ममकुटाथिल यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. कालपासून भाजपाने आरोपाची राळ उठवल्यानंतर आज काँग्रेस आमदार राहुल ममकुटाथिल यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
राहुल हे पलक्कड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला असला तरी ते लोकप्रतिनिधी म्हणून काम सुरू ठेवणार आहेत.
अभिनेत्री रिनी जॉर्ज हीने बुधवारी अनेक धक्कादायक आरोप करून खळबळ उडवून दिली होती. तिने आरोप केला की, एक तरूण राजकीय नेता सोशल मीडियाद्वारे तिच्या संपर्कात आला. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. मात्र हा राजकारणी तिला नंतर अश्लील संदेश पाठवू लागला. तसेच त्याने तिला हॉटेलातही येण्यास सांगितले. एवढेच नाही तर काँग्रेस पक्षातील अनेक महिलांना असेच अनुभव आल्याचाही दावा या महिलेने केला.
बुधवारी आरोप करताना तिने संबंधित राजकारण्याचे नाव उघड करण्यास नकार दिला. केवळ तो काँग्रेस पक्षाचा युवा राजकारणी असल्याचे म्हटले. मात्र विरोधकांनी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष राहुल ममकुटाथिल यांना लक्ष्य केले. राहुल मागच्याच वर्षी पलक्कडच्या पोटनिवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षा या आरोपीची तपासणी करेल आणि कुणाचीही भीडभाड न ठेवता कारवाई करेल. जर कोणाही काँग्रेस नेता यात दोषी आढळला तर त्यावर पक्ष कारवाई करेल.
यानंतर पक्षातून दबाव वाढल्यामुळे राहुल यांनी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, मी कायद्याचा आदर करणारा व्यक्ती आहे. रिनी माझी जवळची मैत्रिण आहे. तिने आरोपात माझे नाव घेतले नव्हते. आजही ती माझी जवळची मैत्रिण आहे आणि मला विश्वास आहे की, तिचे आरोप माझ्याविरोधात नव्हते. राज्यातील सीपीआय (एम) सरकार सध्या विविध आरोपांना तोंड देत असतानाच काही माध्यमांनी मला लक्ष्य केले आहे.