गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या बोइंग विमानाच्या शोधासाठी आता मलेशियन तपासयंत्रणांनी नवी पद्धत अवलंबली आहे. या विमानाचे अपहरण झाले असावे असा कयास असून त्या दिशेनेच तपास करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर बेपत्ता विमानाचा वैमानिक झहारी अहमद शाह याच्या घराची रविवारी कसून तपासणी करण्यात आली.
येथील विमानतळावरून बीजिंगच्या दिशेने झेपावलेले बोइंग विमान ८ मार्चपासून बेपत्ता आहे. व्हिएतनामच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थेशी (एटीसी) संपर्क तुटला होता. दक्षिण चीनच्या समुद्रात ते कोसळले असावे असा प्राथमिक कयास होता. गेल्या आठ दिवसांपासून त्या दिशेने तपास करण्यात आला. मात्र, समुद्रात विमानाचे कोणतेही अवशेष वगैरे आढळले नाहीत. विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीजवळ पडले असावे असाही अंदाज बांधण्यात आला. मात्र, तिथेही काही हाती लागले नाही. बेपत्ता विमानाच्या शोधाच्या कक्षा अंदमान-निकोबापर्यंत वाढवण्यात आल्या. परंतु तरीही शोध लागला नाही. या सर्व पाश्र्वभूमीवर विमानाचे अपहरण झाल्यापासून ते बॉम्बने विमान उडवण्यात आले असेल यापर्यंत सर्व शक्यता पडताळून पाहण्यात आल्या. मात्र, तरीही तपासयंत्रणांच्या हाती काहीही लागले नाहीच. अखेरीस शनिवारी मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी या विमानाचे अपहरण झाले असावे असा अंदाज व्यक्त केला. विमानातील कोणीतरी संपर्कयंत्रणा हेतुत बंद केली असावी व त्यानंतर ते वळवण्यात येऊन अन्यत्र नेण्यात आले असावे असा कयास त्यांनी व्यक्त केला होता. विमानातील सर्व प्रवाशांच्या धार्मिक, राजकीय, वैयक्तिक व गुन्हेगारी स्वरुपाच्या पाश्र्वभूमीही तपासण्यात येत आहेत. मात्र, अजून तरी त्यात काहीही तथ्य आढळलेले नाही.
वैमानिकाच्या घराचा तपास
रझाक यांच्या या वक्तव्याच्या पाश्र्वभूमीवर रविवारी मलेशियन पोलिसांनी बेपत्ता विमानाचा वैमानिक झहारी अहमद शाह याच्या घराची तपासणी केली. शाह यांच्या घरी त्यांनी विमानाचे सिम्युलेटर तयार केले होते व त्यात ते उड्डाणाचा सराव करायचे. पोलिसांनी हे सिम्युलेटर तोडून मुख्यालयात नेले व त्याची पुन्हा जोडणी करून त्यात काही वावगे आढळते किंवा कसे याचा तपास केला. तसेच शाह यांच्या कुटुंबियांचीही चौकशी केली.
तपासाच्या कक्षा रुंदावल्या
बेपत्ता विमान दक्षिण किंवा उत्तरेकडे वळवण्यात आले असावे असा कयास असून त्यादृष्टीने कझाकस्तानपासून ते थायलंडच्या आखातापर्यंत सर्व ठिकाणी तपास करण्यात येणार असल्याचे मलेशियन सूत्रांनी स्पष्ट केले. त्यानुसार सर्व देशांच्या प्रमुखांना विनंती करण्यात आली असल्याचे मलेशियन सरकारने सांगितले. त्यामुळे आता जमिनीवरही विमानाचा शोध घेण्यात येणार आहे.
ब्रिटिश यंत्रणेकडे सिग्नल आला?
दरम्यान, बेपत्ता झालेल्या विमानाकडून ८ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास सिग्नल प्राप्त झाला होता असा दावा ब्रिटिश यंत्रणा इन्मारसॅटने केला आहे. इन्मारसॅटने यासंदर्भातील माहिती मलेशियन सरकारला दिली असून अधिक तपासासाठी त्यांचे अधिकारी क्वालालम्पूरमध्ये दाखल झाले.
भारताने शोध थांबवला
विमानाचे अपहरण झाले असावे या नव्या दाव्यामुळे आता समुद्रातील शोध तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय नौदलाने अंदमानच्या समुद्रात विमानाचा शोध थांबवला आहे. मलेशियाकडून पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पुन्हा शोध सुरू केला जाणार आहे. दरम्यान यामागे भारतावर हल्ला करण्याची योजना असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.