सुमारे चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एमएच ३७० या विमानाच्या शोधासाठी मलेशियाने अमेरिकी कंपनीशी करार केला आहे. या करारानुसार विमानाचे अवशेष शोधण्यात यश मिळाले तर या कंपनीला ७० दशलक्ष डॉलर देण्यात येणार आहेत.

जानेवारीच्या मध्यापासून एमएच३७० विमानाचा नव्याने शोध सुरू करण्यात येणार आहे. विमानाचे अवशेष शोधण्यासाठी सीबेड एक्सप्लोरेशन फर्म या कंपनीची उच्चतंत्र नौका सज्ज झाली आहे. दक्षिण हिंदी महासागरात या विमानाचा शोध घेण्यात येणार आहे. मलेशिया एअरलाईन्सचे जेट विमान मार्च २०१४मध्ये २३९ प्रवाशांसह क्वाललंपूरवरून बीजिंगकडे झेपावले आणि नंतर बेपत्ता झाले होते. त्यानंतर बराच काळ शोध घेऊनही या विमानाच्या बेपत्ता होण्याचे रहस्य उलगडू शकले नाही. बेपत्ता झालेल्या ठिकाणाहून एक लाख २० हजार चौरस किलोमीटर परिसरात शोध घेतल्यानंतरही विमानाचे कोणतेही अवशेष सापडले नव्हते.

ऑस्ट्रेलियन नौदलाच्या मदतीने विमानाच्या शोधासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला यश न मिळाल्याने हा शोध गेल्या वर्षी जानेवारीमध्ये थांबविण्यात आला.

मात्र, तीन खासगी संस्थांनी हे आव्हान स्वीकारताना ‘विमानाचे अवशेष सापडले नाही, तर पैसे स्वीकारणार नाही’ या तत्त्वावर मलेशिया सरकारकडे अर्ज सादर केले. एमएच३७०च्या बेपत्ता होण्याचे रहस्य उलगडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मलेशियाचे परिवहनमंत्री लिओ तिओंग लाय यांनी सांगितले.