गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर 7 आणि 8 जून रोजी मोदी हे मालदीव दौऱ्यावर जातील. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या दौऱ्यादरम्यान मालदीवच्या संसदेला संबोधित करणार आहेत. मालदीवच्या संसदेने ठराव मंजूर करून मोदींना संसदेला संबोधित करण्याचे निमंत्रण दिले आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये मालदीवचा दौरा केला होता. त्यावेळी ते राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांच्या शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित होते. यानंतर झालेल्या बैठकीत मालदीवमध्ये लोकशाही राष्ट्राची पुर्नस्थापना झाल्याबद्दल भारतीय जनतेच्यावतीने पंतप्रधानांनी मालदीवच्या जनतेला शुभेच्छा दिल्या होत्या. प्रदेशात तसेच इतरत्र वाढलेला दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्याबाबतही दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी आपली कटिबद्धता व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशच्या संसदेलाही संबोधित केले होते.

लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये BIMSTEC देशांना निमंत्रण देण्यात आले आहे. BIMSTEC ही सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. भारतासह बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान हे देश या संघटनेचे सदस्य आहेत.