नरेंद्र मोदी यांनी एनडीएप्रणित सरकारमध्ये तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंडीत नेहरुनंतर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होण्याच्या रेकॉर्डशी नरेंद्र मोदींनी बरोबरी केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या. तर भाजपा आणि एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. यानंतर ९ जूनला संध्याकाळी ७.१५ वाजता नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. याबाबत आता मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींवर टीका केली आहे.

काय आहे खरगेंची पोस्ट?

नरेंद्र मोदींची ही असली कसली गॅरंटी? असा सवाल करत खरगे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत देशाने असं उत्तर दिलं की मोदींना दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन सत्ता सांभाळावी लागते आहे. १७ जुलै २०२० या दिवशी नरेंद्र मोदींनी २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छप्पर असेल अशी गॅरंटी दिली होती. ही गॅरंटी फोल ठरली. आता आधीची गॅरंटी पूर्ण झाल्याप्रमाणे मोदी बढाया मारत आहेत. ३ कोटी घरं देऊ सांगत आहेत. मात्र ती कधी देणार त्याची काहीही गॅरंटी नाही. काँग्रेसने २००४ ते २०१३ या कालावधीत ४.५ कोटी घरं दिली. तर भाजपाने दहा वर्षांत ३.३ कोटी घरं दिली आहेत.

हे पण वाचा- योग्य वेळी योग्य पाऊले उचलू ! ‘इंडिया’च्या बैठकीनंतर खरगेंचे वक्तव्य

पंतप्रधान आवास योजनेतही फोलपणा आहे

पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत ४९ लाख शहरी घरांच्या योजनतले ६० टक्के घरांसाठीचे पैसे सामान्य माणसांनी त्यांच्या खिशातून भरले आहेत. शहरी घरांची किंमत ६.५ लाख रुपये आहे. यामधले फक्त १.५ लाख रुपये देतं. यामध्ये राज्यं आणि नगरपालिकांचा ४० टक्के आहे. बाकीचा भार सामान्य माणसांवरच येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयापूर हे गाव मोदींनी दत्तक घेतलेलं पहिलं गाव आहे. या गावात दलित बांधवांकडे स्वतःचं घर नाही तसंच शौचालयही नाही. मागासवर्गीय लोक, दलित यांच्याकडे अद्यापही घरं नाहीत. तसंच रस्त्यांची अवस्थाही वाईट आहे. दलित आणि यादव समाजाचे लोक मातीच्या घरात राहतात. असंही खरगेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मोदी की गॅरंटी या शब्दामागचं वास्तव हेच आहे. मीडिया मॅनेजमेंटमधून बाहेर पडा मोदीजी, जगाला वास्तव ठाऊक आहे. असंही मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच नरेंद्र मोदींनी मोदी की गॅरँटी हा नारा दिला होता. प्रचारसभांमधल्या भाषणांमध्येही त्यांनी हा शब्द वापरला होता. त्यावरुन आता मल्लिकार्जुन खरगेंनी पुन्हा एकदा ही गॅरंटी कशी फोल आहे ते पोस्टमधून सांगितलं आहे.