फौजदारी गुन्हे दाखल असलेले ३६ उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले, त्याचप्रमाणे ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुशेन मोहन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केवळ विजय मल्या आणि नीरव मोदीच नव्हे, तर अलीकडच्या काळात ३६ उद्योगपती देशातून पळून गेले असल्याची माहिती ईडीने सोमवारी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयाला दिली.

आपले समाजात सर्वदूर संबंध आहेत, असा दावा सुशेन गुप्ता याने केला होता. त्यावर, विजय मल्या, ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि स्टर्लिग बायोटेकचे प्रवर्तक संदेसरा बंधू यांचेही समाजात चांगले संबंध होते, तरीही ते देश सोडून गेले. गेल्या काही वर्षांत अशाप्रकारे ३६ उद्योगपती देशातून पळून गेले, असे सांगून ईडीचे विशेष वकील डी.पी. सिंह आणि एन.के. मट्टा यांनी गुप्ता याचा दावा खोडून काढताना सांगितले.

या प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असून, तपास यंत्रणा (ईडी) सुशेनच्या डायरीत उल्लेख केलेला ‘आरजी’ कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे ईडीचे वकील सामवेंद्र वर्मा यांनी युक्तिवादाच्या दरम्यान सांगितले. गुप्ता हा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून, त्याने या प्रकरणातील पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallya not only modi but 36 industrialists absconding from the country says ed
First published on: 16-04-2019 at 01:13 IST