scorecardresearch

वादामुळे अमर्त्य सेन यांना भूखंडाची कागदपत्रे सुपूर्द; ममतांचा पुढाकार

भविष्यात कुणीही त्यांना याबाबत प्रश्न विचारू शकणार नाही, असे ममता यांनी आवर्जून सांगितले.

mamata banerjee hands over land documents to amartya sen
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी या जमिनीशी संबंधित कागदपत्रे सेन यांना सोपवली.

बोलपूर : नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी विश्व भारतीतील एका भूखंडावर ‘अनधिकृत ताबा’ मिळवला असल्याचा आरोप होत असताना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी या जमिनीशी संबंधित कागदपत्रे सेन यांना सोपवली. भविष्यात कुणीही त्यांना याबाबत प्रश्न विचारू शकणार नाही, असे ममता यांनी आवर्जून सांगितले.

अमर्त्य सेन यांनी शांतिनिकेतनमध्ये ‘अनधिकृत रीतीने’ ज्या भूखंडावर ताबा मिळवला आहे, त्याचे भाग तत्काळ आपल्याला सोपवावे, असे विश्व भारतीने गेल्या आठवडय़ात सेन यांना पत्र पाठवून सांगितले होते.

सोमवारी दुपारी बोलपूरला पोहचलेल्या ममता यांनी सेन यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप ‘निराधार’ असल्याचे सांगितले. सेन यांना भविष्यात ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

‘त्यांच्याविरुद्धचे (अमर्त्य सेन) आरोप निराधार आहेत. हा त्यांची प्रतिष्ठा डागाळण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा अपमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही. आम्ही हे खपवून घेणार नाही’, असे सेन यांच्या शेजारी बसलेल्या बॅनर्जी यांनी सांगितले. ‘मी विश्व भारतीचा आदर करते, मात्र या पवित्र संस्थेच्या भगवेकरणाच्या प्रयत्नांचा निषेध करते’, असे ममता म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 03:57 IST