“माझा जन्म जैविकदृष्ट्या झाला नसून. देवानेच मला त्याचे कार्य करण्यासाठी पाठवलं आहे. माझ्या शरीरातील ऊर्जा मानवी ऊर्जा नसून ती दैवी ऊर्जा आहे. त्याचे कार्य मी करत आहे”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे दि. १४ मे रोजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले होते. या विधानाची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खिल्ली उडवली आहे. “मोदी जर देव असतील तर त्यांनी राजकारण करू नये आणि दंगली घडवू नयेत”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

कोलकाता येथे एका जाहीर सभेला संबोधित करत असताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ठजो व्यक्ती स्वतःला देव समजतो त्याने राजकारण करू नये. देव कधीही दंगली भडकवत नाही. आम्ही तुमचे मंदिर बांधू. तुम्हाला प्रसाद चढवू. फुलं वाहू आणि जर देवाची इच्छा असेल तर आम्ही ढोकळाही अर्पण करू.”

Video : “माझा जन्म झालेला नाही, मला देवानेच पाठवले”, पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान चर्चेत

१४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना सदर विधान केले होते. त्यानंतर काँग्रेस आणि विरोधकांकडून या विधानावर टीका करण्यात आली. तसेच भाजपाचे ओडिशामधील पुरी लोकसभेचे उमेदवार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनीही मध्यंतरी केलेले एक विधान वादाचे केंद्र ठरले होते. पुरी मंदिरातील भगवान जगन्नाथ हेदेखील मोदींचे भक्त आहेत, असे पात्रा म्हणाले होते. या विधानानंतर पात्रा यांनी दिलगिरीही व्यक्त केली. चुकून हे विधान तोंडून गेले, असे ते म्हणाले. मात्र लागोपाठ झालेल्या या विधानामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? पहा व्हिडीओ

“मोदींना परमेश्वरानंच पाठवलंय, पण कशासाठी तर…”, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला!

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, मी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांबरोबर काम केलं. जसे की, अटल बिहार वाजपेयी ज्यांनी मला माया लावली. डॉ. मनमोहन सिंग, राजीव गांधी, नरसिंह राव, देवेगौडा यांच्याही बरोबर काम करण्याची संधी मिळाली. पण असा (मोदींसारखा) पंतप्रधान मी कधीही पाहिला नाही. असे पंतप्रधान देशाला नको आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींच्या विधानावर टीका केली होती. मंगळवारी एका जाहीर सभेत बोलत असताना ते म्हणाले की, परमात्म्याने गौतम अदाणी, मुकेश अंबानी अशा धनदांडग्यांची मदत करण्यासाठी नरेंद्र मोदींना पाठवले आहे. ते गरीबांची सेवा करत नाहीत. तसेच शेतकरी आणि मजूरांची सेवा करण्यासाठी मोदींना देवाने पाठवले नाही का? असाही खोचक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.