गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांची गय करणार नाही, असे आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमतीमध्ये स्पष्ट केले. या वक्तव्याला १२ तास व्हायच्या आतच झारखंडमधल्या रामगढमध्ये एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. अलीमुद्दीन अन्सारी उर्फ असगर अन्सारी आपल्या मारूती गाडीमध्ये गोमांस घेऊन चालला होता. बाजरटांड गावाजवळ एका समूहाने त्याची गाडी अडवली. त्याच्या गाडीत गोमांस असल्याचे पाहून त्याला बाहेर खेचले आणि बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की त्यात या असगर अन्सारीचा प्राण गेला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी असगर अन्सारीला रूग्णालयातही नेले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. असगर अन्सारीची हत्या हा पूर्वनियोजत कट आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक आर. के मलिक यांनी म्हटले आहे. असगरच्या विरोधात काही मुलांचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर बीफ व्यापारात सहभागी असलेल्या काही व्यापाऱ्यांनी या असगरच्या हत्येची सुपारी दिली असण्याची शक्यता आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच हल्लेखोरांची ओळख आम्ही पटवली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या तीन दिवसांत बीफ प्रकरणावरून ही दुसरी हत्या आहे. साबरमतीमध्ये आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेचा कडाडून निषेध केला होता. मात्र त्यांच्या वक्तव्याशी कथित गोरक्षकांना आणि हिंसा पसरवणाऱ्यांना काहीही फरक पडलेला नाही, झारखंडमध्ये घडलेली ही हत्या ही याच प्रकाराचे द्योतक आहे. जोपर्यंत अशा समाजकंटकांना कडक शिक्षा केली जाणार नाही तोवर त्यांना जरब बसणार नाही. निदान आता तरी सरकारने कारवाई करावी अशी अपेक्षा लोकांना आहे.