Man Arrested For Sending Bomb-Laden Speaker To Husband Of Woman He Loved : छत्तीसगडमध्ये एका २० वर्षीय इलेक्ट्रिशियनने एकतर्फी प्रेमातून एका महिलेच्या पतीची हत्या करण्यासाठी बॉम्ब पाठवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेच्या पतीसाठी भेट म्हणून पाठवलेल्या म्युझिक सिस्टीम स्पीकरमध्ये त्याने इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (IED) बसवले होते, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, आरोपीने ऑनलाइन ट्युटोरियल्स मधून माहिती मिळवून हे आयईडी तयार केला,तसेच हा म्युझिक सिस्टीम स्पीकर प्लग इन केल्यावर त्याचा स्फोट होईल असे डिझाइन केले. त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये आढळून आले की त्याने “पोलिसांच्या हाती न लागता बॉम्ब वापरून एखाद्या व्यक्तीला कसे मारावे” हे सर्च केले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशाच एका प्रकरणात एप्रिल २०२३ मध्ये नवीन लग्न झालेला एक व्यक्ती आणि त्याचा मोठी भाऊ यांची हत्या झाली होती, या घटनेत देखील होम थिएटर म्युझिक सिस्टम लग्नात भेट म्हणून देण्यात आले होते. हे गिफ्ट त्या व्यक्तीच्या पत्नीच्या आधीच्या प्रियकराने पाठवले होते. या गिफ्टचा घरात स्फोट झाला आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
आता समोर आलल्या प्रकरणात मुख्य आरोपी विनय वर्मा आणि इतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती खैरागड-चुईखदान-गंडाई जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक(एसपी) लक्ष्य शर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
इतर आरोपींची नावे परमेश्वर वर्मा (२५), गोपाल वर्मा (२२), घासिराम वर्मा (४६), दिलीप धिमार (३८), गोपाल खेलवर आणि खिलेश वर्मा (१९) अशी आहेत.
गंडाई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मानपूर गावात इंडिया पोस्टाचा बनावट लोगो लावून व्यवस्थित पद्धतीने पॅक करण्यात आलेले एक संशयास्पद पार्सल तीन-चार दिवसांपूर्वी आणून देण्यात आले होते, यानंतर हा कट उजेडात आला.
हे पार्सल गावातील रहिवासी अफसर खान याच्यासाठी पाठवण्यात आले होते, याच व्यक्तीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण हे पार्सल संशयास्पद वाटल्याने खान यांनी तातडीने पोलिसांना कळवले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
दोन किलो स्फोटकांचा वापर
बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने पॅकेजची तपासणी केली आणि त्यांना एका नव्या स्पीकरमध्ये २ किलो वजनाचे आयईडी लपवून ठेवल्याचे आढळून आले, असे एसपीने सांगितले.
तांत्रिक विश्लेषण केले असता दिसून आले की आईडी हे स्पीकर सुरु करण्यासाठी प्लग केल्याबरोबर स्फोट होईल असे डिझाइन करण्यात आलेले होते. स्पीकरच्या वायरिंगला जोडलेल्या डिटोनेटरपर्यंत करंट पोहोचताच स्फोट झाला असता असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिलेटीनच्या कांड्या या बॉम्बमध्ये प्रमुख स्फोटक म्हणून वापरण्यात आल्या होत्या आणि स्पीकरचे बाहेरचे अवरण हे स्फोटानंतर उडणारे तुकडे प्राणघातक ठरले असते, असे त्यांनी सांगितले. खैरागडमधील कुसामी गावातील रहिवासी विनय वर्मा याने खानच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात आढळून आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
इलेक्ट्रिशियन आरोपीचा प्रताप
मिळालेल्या माहितीनुसार, वर्मा हा एक इलेक्ट्रिशियन आहे. त्याने स्पीकर खरेदी केले आणि ऑनलाइन ट्यूटोरियलच्या मदतीन आईडी असेंबल केले, असेही शर्मा यांनी सांगितले. त्याच्या फोनच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये पोलिसांच्या हाती न लागता बॉम्बने एखाद्या व्यक्तीला कसे मारावे असे सर्च केल्याचे आढळून आले.
आरोपीचे खान याच्या पत्नीवर तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून एकतर्फी प्रेम होते. काही महिन्यांपूर्वी तिचे खानशी लग्न झाल्यानंतर वर्मा याने तिच्या पतीला ठार करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे, असेही पोलिसांनी सांगितले. तसेच तपासात आढळून आले की आरोपींनी बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेली स्फोटके की त्यांनी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील दगडांच्या खाणीतून मिळवली होती.
दुर्ग येथील रहिवासी परमेश्वर याने दुर्ग येथील रहिवासी गोपाळ आणि दिलीप यांच्याकडून जिलेटिन रॉड खरेदी करण्यासाठी ६,००० रुपये दिले होते. घासीरामने स्फोटके पोहोचवली, तर खिलेश याच्यावर पार्सलवर लावण्यासाठी बनवलेला बनावट इंडिया पोस्ट लोगो तयार केल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गोपालच्या मदतीने वर्माने हे स्फोटके बसवलेलं पार्सल खान याच्या दुकानात पोहचवलं. दिलीप आणि गोपाल यांच्या दुर्ग येथील घरावर छापे टाकले असता ६० जिलेटीनचे कांड्या आणि दोन डिटोनेटर्स आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.