पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. शहजाद असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याला उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. शहजाद हा रामपूर जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याला अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. १७ मे रोजी ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली. त्यानंतर आता शहजादला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली.
शहजादला १८ मे रोजी करण्यात आली अटक
दहशतवाद विरोधी पथकाने शहजादला अटक केली. त्यानंतर ही माहिती दिली आहे की शहजाद हा पाकिस्तानच्या ISI या संस्थेसाठी काम करत होता. शहजाद हा पाकिस्तानच्या एजंटशी संपर्कात होता. १८ मे रोजी शहजादला अटक करण्यात आली. युट्यूबर ज्योती मल्होत्राप्रमाणेच शहजादवरही हेरगिरीचा आरोप आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने काय म्हटलंय?
दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार शहजाद नावाचा एक जण पाकिस्तानसाठी हेरगिरी करतोय तसंच तस्करी करतो आहे याची माहिती आम्हाला मिळाली. यानंतर आम्ही त्याला अटक केली. शहजात हा जनपद रामपूर या ठिकाणी असलेल्या आझाद नगर या ठिकाणी राहतो. आत्तापर्यंत तो अनेकदा पाकिस्तानला जाऊन आला आहे. कपडे, परफ्युम, मसाले तसंच इतर वस्तू तो पाकिस्तानला घेऊन जातो. या व्यापाराच्या आडून शहजाद आयएसआयशी संबंध ठेवून आहे. या संस्थेच्या तो संपर्कात आहे. शहजादने भारतीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली आहे.
कुठल्या कलमांच्या अन्वये गुन्हा दाखल?
शहजादच्या विरोधात कलम १४८, कलम १५२ च्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानला जातो आणि तिथे व्यवसाय करण्याच्या बहाण्याने जाऊन भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवतो असं एटीएसने म्हटलं आहे. शहजादचं पूर्ण नाव शहदाज अब्दुल बहाब असं आहे. भारतीय लष्कर आणि सुरक्षेच्या संदर्भातली माहिती तो पाकिस्तानला गेल्या काही वर्षांपासून पुरवतो आहे असंही एटीएसने म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांतून आयएसआयशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. एकाला विजयनगरहून तर एकाला हैदराबादहून अटक करण्यात आली आहे. एकाचं नाव सिराज आहे तर दुसऱ्याचं नाव समीर आहे.