Canada lottery girlfriend fraud: कॅनडामधील एका पुरूषाबरोबर विचित्र घटना घडली आहे. दीर्घकाळ जिच्याशी प्रेमसंबंध होते, त्याच प्रेयसीने मोठा दगाफटका केल्याचा आरोप सदर पुरूषाने केला आहे. ३० कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर त्याच्या वतीने प्रेयसीला बक्षीस घेण्यास सांगितल्यानंतर प्रेयसी बक्षीसाची रक्कम घेऊन पसार झाली. लॉरेन्स कॅम्पबेल असं पीडित प्रियकराचं नाव आहे. त्याला ३.६ दशलक्ष डॉलर्सची (३० कोटी रुपये) लॉटरी लागली होती. आता पीडित प्रियकरानं प्रेयसीच्या विरोधात खटला दाखल केला आहे.

लॉरेन्स कॅम्पबेलचा दावा आहे की, त्यानं २०२४ मध्ये लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. लॉटरी लागली तेव्हा त्याचं पाकिट हरवल्यामुळे त्याच्याकडे ओळखपत्र म्हणून वैध पुरावा नव्हता. यासाठी बक्षीस मिळवण्यात अडचण येत होती. लॉटरी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यानं त्याची प्रेयसी क्रिस्टल ॲन मॅके हिला त्याच्या वतीने वेस्टर्न कॅनडा लॉटरी कॉर्पोरेशन कडून बक्षीस घेण्यास सांगितले.

कॅम्पबेलच्या वकिलांनी सांगितलं की, कॅम्पबेल हे प्रेयसीशी प्रामाणिक आणि अतिशय उत्तम संबंध ठेवून होते. त्यामुळेच त्यांनी क्रिस्टलवर डोळे झाकून विश्वास ठेवला. ते दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि एकत्र राहत होते. सीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना कॅम्पबेल यांनी सांगितलं की, माझं बँक खातंही नव्हतं. त्यामुळं जिंकलेले पैसे प्रेयसीच्या नावावर जमा करण्याची परवानगी मी दिली होती.

बक्षीस स्वीकारेपर्यंत सर्व काही ठीक सुरू होतं. बक्षिसाच्या रकमेचा प्रातिनिधिक चेक स्वीकारताना कॅम्पबेल आणि क्रिस्टल यांनी फोटोशूट केलं होतं. याचा व्हिडीओही काढला होता. बक्षीसाची रक्कम आल्यानंतर क्रिस्टल तीन आठवड्यांपासून बेपत्ता आहे. ते दोघे राहत असलेल्या हॉटेलमध्ये ती परतलेली नाही. तसेच कॅम्पेबलबरोबरचा सर्व संपर्कही तिने तोडला.

या प्रकरणात पुढे धक्कादायक वळण मिळाले. ॲनला शोधण्यासाठी कॅम्पेबलनं तिच्या नेहमीच्या ठिकाणांवर भेटी दिल्या. ती पार्टीसाठी जात असलेल्या हॉटेल्सना भेट दिली. तेव्हा प्रेयसी क्रिस्टल वेगळ्याच पुरूषाबरोबर नको त्या अवस्थेत आढळून आली. कॅम्पेबलसाठी हा मोठा धक्का होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रिस्टलनं कॅम्पेबलचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, असे तिच्या वकिलांनी सांगितलं. कॅम्पेबलनं क्रिस्टलसह लॉटरीच्या कंपनीलाही सहआरोपी केलं आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चुकीचा सल्ला दिला. तसेच बक्षीसाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर वळवल्यास संभाव्या धोक्याची कल्पना दिली नाही, असा आरोप त्याने केला आहे.