Crime News : दिल्लीतील रोहिणी येथे एका व्यक्तीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी गिफ्टच्या देवाणघेवाणीवरून शनिवारी झालेल्या वादानंतर या हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुपारी साडे तीन वाजता केएनके मार्ग पोलीस ठाण्यात रोहिणीच्या सेक्टर १७ मध्ये बहीण आणि आईची हत्या झाल्याचा एक पीसीआर कॉल आला होता. यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना कुसुम सिन्हा (६३) आणि त्यांची मुलगी प्रिया सेहगल (३४) यांचे मृतदेह आढळून आले.
या घटनेबाबत फोन करणारी व्यक्ती म्हणजेच कुसुम यांचा मुलगा मेघ सिन्हा (३०) याने सांगितले की, २८ ऑगस्ट रोजी त्याची आई ही प्रियाच्या घरी तिचा नातू चिरागचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. कार्यक्रमादरम्यान प्रिया आणि तिचा पती योगेश यांच्यात भेटवस्तूवरून वाद सुरू झाला. कुसुम या भांडण मिटवण्यासाठी प्रियाच्या घरीच राहिली, असेही त्याने सांगितले.
३० ऑगस्ट रोजी जेव्हा फोन करणाऱ्याने त्याच्या आईला फोन केला तेव्हा त्याचा फोन कोणीही उचलला नाही. त्यानंतर तो प्रियाच्या घरी पोहचला आणि तेथे त्याला फ्लॅटला बाहेरून कुलूप असल्याचे दिसून आले, तसेच दरवाजाजवळ त्याला रक्ताचे डागही दिसले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याने तत्काळ कुटुंबातील इतरांना याबद्दल माहिती दिली आणि त्यानं दरवाजा तोडला, आत गेल्यावर त्याला खोलीमध्ये त्याची आई आणि बहीण हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याने सध्या बेरोजगार असलेला प्रियाचा पती योगेश सेहगल याने त्याच्या आईची आणि बहिणीची हत्या केली आणि मुलांना घेऊन पळून गेला, असा आरोप केल्याचे पोलिसांनी सांगितले.
योगेश याला एएनके मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याचे रक्ताने माखलेले कपडे आणि गु्न्ह्यात वापरलेली एक कात्री ही घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचे कारण हे घरगुती वाद असल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
महिलेच्या मुलाने काय सांगितलं?
प्रियाचा भाऊ हिमालय याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “माझी आई एकादिवसापूर्वी माझ्या बहिणीच्या घरी गेली होती आणि ती दुसऱ्या दिवशी परत येईल असे तिने सांगितले होत. आम्ही तिला फोन केला तेव्हा तिने सांगितले की, माझी बहीण आणि तिचा पती यांच्यात भांडण सुरू आहे आणि ते सोडवून ती परत येईल. पण ती परत आलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता, ११.३० वाजता आणि पुन्हा एकदा १२ वाजता फोन करत राहिलो, पण तिने किंवा माझ्या बहिणीने फोन उचलला नाही.आम्हाला वाटले की ते झोपेत असतील. दुपारी आम्ही जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा आम्ही घरी पोहचलो आणि दार ठोठावले तेव्हा आम्हाला कुलूपावर रक्ताचे डाग दिसले.”
तो पुढे बोलताना म्हणाला की, जेव्हा ते आतमध्ये गेले तेव्हा त्याची आई आणि बहीण हे रक्ताने माखलेले होते. “आम्ही त्यांच्या घरी दुपारी साडेतीनच्या आसपास गेलो.माझ्या मेहुण्याने त्यांची हत्या केली आणि मुलांना घेऊन पळून गेला. असं कोण करतं? प्रत्येकाच्या लग्नात भांडणे होत असतात, त्यांचे लग्न १७ वर्षांपूर्वी झाले आहे. पण कोण अशा प्रकारे त्याच्या पत्नी आणि सासूची हत्या करतो? हे अमानवीय आहे,”असेही तो म्हणाला.