काही दिवसांपूर्वी एका विकृताने विराट कोहलीच्या अवघ्या १० महिन्याच्या चिमुकलीला सोशल मीडियावरून धमकी दिली होती. यावरून बराच वाद झाला होता. तमाम भारतीयांनी विराट कोहलीला पाठिंबा दर्शवतानाच संबंधित विकृत व्यक्तीची निंदा केली होती. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने देखील स्वत:हून दखल घेतली होती. अखेर ही धमकी देणाऱ्या विकृताला मुंबई पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना टीम इंडिया हरल्यानंतर विराट कोहलीच्या मुलीला या विकृतानं धमकी दिली होती.

या विकृताचं नाव रामनागेश अलिबाठिनी असून तो तेलंगणाचा आहे. पेशाने आयटी इंजिनिअर असलेल्या रामनागेशनं नुकताच नोकरीचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली असून सोशल मीडियावर अशा प्रकारची धमकी दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आता न्यायालयासमोर सादर केलं जाणार असून त्यानंतर त्याची सविस्तर माहिती दिली जाईल.

ही धमकी आल्यानंतर संबंधित व्यक्ती पाकिस्तानची असल्याचा देखील प्रचार केला गेला होता. मात्र, ती व्यक्ती भारतीयच असल्याचं नंतर उघड झालं होतं. अटक केल्यानंतर रामनागेशविरोधात भादंवि ३५४ अ, ५०६, ५०० या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाने (DWC) दखल घेतली आहे. दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली असून अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस देताना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानविरुद्धच्या दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्मांधांनी सोशल मीडियावरून मोहम्मद शमीला लक्ष्य केले. मात्र, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली. विराट कोहलीनेही शमीला पूर्णपणे पाठिंबा दिला. लक्ष्य करणाऱ्या धर्मांधांना विराटने खडसावले आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मामुळे लक्ष्य करणे अतिशय निंदनीय असल्याचे मत दिले. विराटच्या या वक्तव्यानंतर काही विकृतांनी असभ्यपणे त्याच्या दहा महिन्यांच्या मुलीला लक्ष्य केले.