इस्कॉनकडून गायींची कत्तलखान्यांना विक्री केली जाते, असा खळबळजनक आरोप भाजपा मनेका गांधींनी केला आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) ने भाजप खासदार मनेका गांधी यांना १०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. मनेका गांधी यांनी आरोप केले तेव्हाच इस्कॉनने या आरोपांना निराधार म्हटलं होतं.
“इस्कॉनवर पूर्णपणे निराधार आरोप लावल्याबद्दल मनेका गांधी यांना १०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस आम्ही आज पाठवली आहे. इस्कॉनचे भक्त, समर्थक आणि हितचिंतक यांचा जगभरातील समुदाय या बदनामीकारक, निंदनीय आरोपांमुळे अत्यंत दु:खी झाला आहे. इस्कॉनविरोधातील खोट्या प्रचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही”, असे इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले.
हेही वाचा >> जाणून घ्या! इस्कॉनची स्थापना कोणी आणि का केली? काय आहे कृष्ण चळवळीमागचा इतिहास?
काय म्हणाल्या मनेका गांधी?
मनेका गांधींच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. “मी तुम्हाला सांगते. देशातले सर्वात मोठे विश्वासघातकी कुणी असेल तर ते इस्कॉन आहे. ते गौशाला ठेवतात, त्याबदल्यात सरकारकडून बरेच फायदे मिळतात. मी हल्लीच त्यांच्या अनंतपूर गौशाळेत गेले होते. तिथे एकही साधी गाय नव्हती. सर्व दुभत्या गाई होत्या. तिथे एकही वासरू नव्हतं. याचा अर्थ सगळे विकले. ISKCON आपल्या सर्व गायी कत्तलखान्यात विकते. हेच रस्तोरस्ती हरे राम, हरे कृष्णा करत फिरत असतात. दूध-दूध म्हणत असतात. पण जेवढ्या गायी यांनी खाटिकांना विकल्या असतील, त्या कदाचित इतर कुणी विकल्या नसतील. जर हे असं करू शकतात, तर इतरांबद्दल काय बोलायचं?” असा आरोप मनेका गांधींनी केला आहे.
हेही वाचा >> Video: “ISKCON कत्तलखान्यांना गायी विकते”, मनेका गांधींचा गंभीर आरोप, ट्रस्टनं दिलं सविस्तर उत्तर!
ISKCON चं उत्तर…
दरम्यान, मनेका गांधी यांचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर इस्कॉनकडून त्यावर उत्तर देण्यात आलं. इस्कॉनचे युधिष्ठिर गोविंद दास यांनी यासंदर्भात एक्सवर सविस्तर पोस्ट केली आहे. “मनेका गांधी यांनी निराधार व चुकीचे आरोप केले आहेत. ISKCON नं गायी व बैलांच्या संरक्षणाचा नेहमीच पुरस्कार केला आहे, त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले आहेत. हे फक्त भारतात नाही, तर जगभरात इस्कॉननं केलं आहे. इस्कॉनमध्ये गायी व बैलांची सेवा केली जाते, त्यांना कत्तलखान्यांत विकलं जात नाही”, अशी पोस्ट युधिष्ठिर गोविंद दास यांनी केली आहे.