नवी दिल्लीतील ‘नेहरू प्लेस’ आणि ‘गफार मार्केट’ या बाजारांप्रमाणेच मुंबईतील ‘मनीष मार्केट’ आणि ‘लॅमिंग्टन रोड’ हेही बाजार जागतिक पायरसी आणि बौद्धिक मालमत्ता अधिकारांच्या उल्लंघनासाठी जगभरात कुप्रसिद्ध आहेत, असे निरीक्षण अमेरिकेने नोंदविले आह़े  तसेच हैदराबादमधील चिनॉय ट्रेड सेंटर आणि हाँगकाँग बाजार ही ठिकाणेही अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ‘कुख्यात बाजार’ म्हणून नमूद करण्यात आली आहेत़
नेहरू प्लेस हे भारतभरातील महत्त्वाच्या शहरांतील कुख्यात बाजारांत अग्रस्थानी आह़े  पायरेटेड सॉफ्टवेअर, चित्रपटांच्या- गाण्यांच्या पायरेटेड सीडी आणि बनावट वस्तूंची मोठय़ा प्रमाणात खरेदी – विक्री या बाजारांत चालते, असे अहवालात नमूद करण्यात आले आह़े
अशा बाजारांतून बनावट वस्तूंची विक्री होत असल्यामुळे मूळ वस्तूंच्या विक्रीमूल्यात घट होत़े  तसेच बनावट औषधे, गाडय़ांचे बनावट सुटे भाग यांच्या विक्रीमुळे ग्राहकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होऊ शकतात, असे व्यापार प्रतिनिधी माइक फ्रोमन यांनी सांगितल़े  या बाजारांबाबत आमच्या व्यापार भागीदारांनी तात्काळ सावध व्हावे, असेही ते म्हणाल़े
मुंबईतील ‘मनीष मार्केट’ आणि ‘लॅमिंग्टन रोड’ हे निमसंघटित बाजार असून येथे हिंदी – इंग्रजी चित्रपटाच्या पायरेटेड सीडी- डीव्हीडी मोठय़ा प्रमाणात विकण्यात येतात़  दुकानदार या सीडी पोलीस धाडीच्या आधी लपविण्यात यशस्वी होतात आणि त्यानंतर काही वेळातच त्यांची विक्री पुन्हा सुरू होते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आह़े  हैदराबादमधील चिनॉय ट्रेड सेंटर आणि हाँगकाँग बाजार येथे मोठय़ा प्रमाणात संगणकाचे बनावट सुटे भाग आणि पायरेटेड सॉफ्टवेअर विकण्यात येत असल्याचेही अहवाल सांगतो़