नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आपल्याविरुद्ध ‘लूकआउट नोटीस’ जारी केली असल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारी केला. मात्र, इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सीबीआयमधील सूत्रांनी दावा केला की, सिसोदिया किंवा दिल्ली सरकारच्या  उत्पादन शुल्क विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याविरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आलेली नाही. अबकारी धोरण गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आठ खासगी व्यक्तींविरोधात (ज्यात परवानाधारक, दलाल, वितरक, अन्य मध्यस्थांचा समावेश आहे) ही नोटीस जारी केली आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मनीष सिसोदिया यांनी सांगितले, की ‘सीबीआय’ला माझ्या घरी घातलेल्या छाप्यात काहीही मिळालेले नाही. हा सर्व प्रकार म्हणजे घडवून आलेले नाटक आहे. मी दिल्लीत उघडपणे वावरत आहे. तरीही तुम्ही मला शोधू शकत नाही का? असा सवालही त्यांनी पंतप्रधान मोदींना विचारला.

‘सीबीआय’ने शुक्रवारी  अबकारी धोरण प्रकरणात  सिसोदिया यांच्या निवासस्थानासह देशात ३१ ठिकाणी छापे टाकले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी  म्हटले आहे, की  राज्य सरकारांसह समन्वयाने काम करण्याऐवजी केंद्रातील मोदी सरकार अवघ्या देशाशी लढत आहे.

दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी १७ नोव्हेंबर २०२१ पासून लागू झालेल्या अबकारी नीतीच्या अंमलबजावणीत कथित प्रक्रियात्मक चूक आणि नियमांचे उल्लंघन झाल्याने गेल्या महिन्यात चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ‘सीबीआय’ने सिसोदिया यांच्यासह अन्य काही ठिकाणी छापेमारी केली होती. उपराज्यपालांतर्फे चौकशीचे निर्देश दिल्यानंतर दिल्ली सरकारने जुलैत हे धोरण मागे घेतले होते.

या संदर्भात सिसोदिया यांनी ‘ट्विट’ केले, की आपण टाकलेले सर्व छाप्यांत काहीच हाती लागले नाही. अपयशच हाती लागले. एका पैशाचाही गैरव्यवहार तुम्हाला सापडला नाही. आता तुम्ही ‘लूकआउट नोटिस’ प्रसृत केली. हे काय नाटक आहे मोदीजी? मी दिल्लीत उघडपणे फिरत आहे. तरीही मी तुम्हाला सापडत नाही का? मी कुठे यायचे, ते तुम्हीच मला सांगा.अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीतील अनियमिततेसंदर्भात ‘सीबीआय’तर्फे १३ जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सिसोदिया यांचेही नाव आहे. यात दोन कंपन्यांचाही समावेश आहे.

दररोज सीबीआई-ईडीचा खेळ!

रोज सकाळी केंद्र सरकार ‘सीबीआई-ईडी’चा खेळ सुरू करते, अशी टीका करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘ट्विट’मध्ये म्हटले आहे, की सध्या सामान्य व्यक्ती वाढलेल्या महागाईशी दोन हात करत आहे. देशात करोडो तरुण बेरोजगार आहेत. अशा काळात केंद्र सरकारने राज्य सरकारांशी हातमिळवणी करून बेरोजगारी आणि महागाई हटवण्याचे उपाय केले पाहिजेत. मात्र, केंद्र सरकारने अवघ्या देशाशीच संघर्ष मांडला आहे. रोज सकाळी ‘सीबीआई-ईडी’चा खेळ सुरू केला जातो. यातून देश प्रगती कशी करणार?