मकर संक्रातीनिमित्त पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र, पतंगासाठी लागणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे. या मांजाच्या वापरावर बंदी असूनही छुप्या पद्धतीनं त्याची सर्रास विक्री होत असते. आता चिनी मांज्यानं गळा कापल्यानं लष्करी जवानाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना हैदराबाद येथे घडली आहे.

नायक के कोटेश्वर रेड्डी ( २९ वर्ष ) असं मृत जवानाचं नाव आहे. रेड्डी हे गोवळकोंडा येथील लष्करी रूग्णालयात शनिवारी ( १३ जानेवारी ) कामासाठी दुचाकीवरून जात होते. तेव्हा, हैदराबादमधील लंगर हौजे उड्डाणपूल येथे चिनी मांजा त्यांच्या गळ्यात अडकल्यानं ते दुचाकीवरून खाली पडले.

यात मांज्यामुळे गळा कापल्यानं रेड्डी यांना गंभीर दुखापत झाली. दुचाकीवर असलेले सहकारी शंकर गौड यांनी रेड्डी यांना रूग्णालयात दाखल केलं. पण, खूप रक्तस्त्राव झाल्यानं रेड्डी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. रेड्डी यांच्या पत्नीनं मांजा विकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचं आवाहन पोलिसांना केलं आहे.